गेल्या काही दिवसापासून रोहितच्या आत्महत्या प्रकरणामुळे केंद्रातील राजकारण प्रभावित झाले आहे. त्यात आता हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे.
‘या प्रकरणात जे तथ्य समोर आले आहे आणि जी माहिती मला मिळाली आहे, त्यानुसार रोहित हा दलित नव्हताच. मात्र काही जणांनी त्याला दलित म्हणून या संपूर्ण प्रकरणाला सांप्रदायिक रंग दिला आहे. दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही’ असे स्वराज यांनी म्हटले आहे. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाला आता आक्रमक पवित्रा आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी देखील रोहितच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत आपला देश कुठे चालला आहे असे विचारले आहे. शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे एक दिवसाच्या उपोषणावर बसले होते. त्यांच्या या दौऱ्याला अभाविपने विरोध केला होता.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ठेवत रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांवर ऑगस्ट २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्याच नैराश्यातून रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येपासून दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु आहे.

Story img Loader