हरियाणा परिवहन महामंडळाच्या बसगाडीत युवकांनी विनयभंग केल्याचा आरोप करून त्यांना मारहाण करणाऱया दोन बहिणींच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका उपस्थित झाली आहे. या दोन्ही बहिणी खोटे बोलत असून, संबंधित घटनेत युवकांचा कोणताही दोष नसल्याचा दावा या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात संबंधित युवकांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या युवकांपैकी एकाने आपल्या वयस्कर महिला नातेवाईकासाठी एक तिकीट घेतले. या तिकीटाचा क्रमांक आठ होता. युवक गाडीमध्ये गेल्यावर तिथे त्या जागेवर दोन युवती बसलेल्या त्याला दिसल्या. युवकाने त्या दोन्ही युवतींना त्या जागेवरून उठण्यास सांगितले. मात्र, उठण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे चिडलेल्या त्या दोघींना युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच गाडीतून प्रवास करणाऱया काही प्रवाशांनी याबद्दल माहिती दिली. यापैकी काही प्रवासी संबंधित युवती ज्या गावात राहतात, तेथील राहणारे आहेत.
गावातील प्रत्यक्षदर्शींनीच संबंधित युवतींविरोधात वक्तव्य केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या युवतींनी यापूर्वीही त्यांच्या महाविद्यालयातील एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओही पुढे आला आहे. पोलीसांनी या संपूर्ण प्रकरणी दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
तीन युवकांनी दोन युवतींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकीने आपल्याकडील पट्टय़ाने त्यांचा प्रतिकार केला, असा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी प्रसारित झाला होता.
बसमध्ये युवकांची धुलाई करणाऱया ‘त्या’ दोन बहिणी खोटारड्या?
हरियाणा परिवहन महामंडळाच्या बसगाडीत युवकांनी विनयभंग केल्याचा आरोप करून त्यांना मारहाण करणाऱया दोन बहिणींच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका उपस्थित झाली आहे.
First published on: 03-12-2014 at 11:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohtak sisters are talking false