हरयाणा परिवहन महामंडळाच्या बसगाडीत विनयभंग करणाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करणाऱ्या रोहतकमधील दोघा बहिणींचा येत्या प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात येणार आहे. सदर बसगाडीचा चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन हरयाणा सरकारने पोलीस महासंचालक आणि राज्य परिवहन विभागाला प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. बसगाडीत विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन युवकांचा समर्थपणे मुकाबला करणाऱ्या शूर भगिनींना प्रजासत्ताकदिनी रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले.
तीन युवकांनी भगिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकीने आपल्याकडील पट्टय़ाने त्यांचा प्रतिकार केला, या वेळी बसगाडीतील अन्य प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. या सर्व प्रकाराचे एका प्रवाशाने मोबाइलवरून चित्रीकरण केले होते.