* मायदेशी गेलेले दोन आरोपी भारतात परतणार नसल्याने नाचक्की
* इटलीकडून भारताची फसवणूक
इटलीकडून झालेल्या फसवणुकीमुळे भारताची नाचक्की झाली आहे. केरळच्या समुद्रात दोन भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या इटलीच्या दोन नाविकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी भारतात न धाडण्याचा निर्णय इटलीने घेतल्याने मंगळवारी नव्या वादाला तोंड फुटले. या पाश्र्वभूमीवर केरळमधील खासदारांच्या गटाने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली असता इटलीची ही भूमिका अस्वीकारार्ह असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत इटलीचे एक जहाज केरळ किनारपट्टीजवळ आले असता ही घटना घडली. या जहाजाच्या आसपास असणाऱ्या दोघा भारतीय मच्छीमारांना समुद्री चाचे समजून इटलीच्या नाविकांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात भारतीय मच्छीमारांचा मृत्यू झाला. यानंतर इटलीच्या मॅसिमिलीआनो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन या दोघा नाविकांवर खटला दाखल करण्यात आला. या खटल्याचे कामकाज सुरू असताना या दोघांनी नाताळनिमित्त मायदेशी जाण्याची अनुमती मागितली, सर्वोच्च न्यायालयाने ही अनुमती दिल्याने ते दोघे मायदेशी जाऊन आले. गेल्या महिन्यात इटलीतील निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांनी पुन्हा एकदा मायदेशी जाण्याची अनुमती मागितली, या वेळीही न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली, मात्र मतदान होऊन महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतरही हे दोघे भारतात येण्यास तयार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
भारताने हा प्रश्न राजनैतिक पातळीवर सोडवावा, असे आवाहन आम्ही केले होते, मात्र त्यास त्यांचा प्रतिसाद लाभला नाही, ही घटना समुद्रात घडल्याने आंतरराष्ट्रीय कायदा लागू होतो, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचा निकाल लागेल, अशी अधिकृत भूमिका इटलीने घोषित केली. या घडामोडींमुळे केरळमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. तेथील खासदारांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले. इटलीची ही भूमिका अस्वीकारार्ह असून यातून काही तरी मार्ग काढण्याची सूचना आपण परराष्ट्रमंत्र्यांना करू, असे आश्वासन पंतप्रधानांनी या खासदारांना दिले. काँग्रेस तसेच भाजपच्या खासदारांनीही इटलीच्या भूमिकेचा निषेध करीत पंतप्रधानांकडून हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
राहुल यांचे मौन
म्इटलीच्या या भूमिकेवर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संसदेच्या आवारात अनेक पत्रकारांनी त्यांना घेरले व याविषयी प्रश्नांची सरबत्ती केली. राहुल यांनी मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला व मौन बाळगले.
इटलीची भूमिका अस्वीकारार्ह – पंतप्रधान
* मायदेशी गेलेले दोन आरोपी भारतात परतणार नसल्याने नाचक्की * इटलीकडून भारताची फसवणूक इटलीकडून झालेल्या फसवणुकीमुळे भारताची नाचक्की झाली आहे. केरळच्या समुद्रात दोन भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या इटलीच्या दोन नाविकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी भारतात न धाडण्याचा निर्णय इटलीने घेतल्याने मंगळवारी नव्या वादाला तोंड फुटले.
First published on: 13-03-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Role of italy is unacceptable pm