काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आहे. मंगळवारी (दि. २० फेब्रुवारी) अमेठी लोकसभेतून यात्रा जात असताना राहुल गांधी यांनी एकेठिकाणी रोड शो घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांनी अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह उद्योगपती, अब्जाधीश जमले होते, असे म्हटले. त्यानंतर त्यांनी तिथेच वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला आधी त्याचे नाव विचारले. मग त्या पत्रकाराच्या मालकाचे नाव विचारून मालकाची जात काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार लवकर बोलत नसल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार मंगळवारी अमेठी येथे इंडिया न्यूज वृत्तवाहिनीच्या पत्रकाराबरोबर हा प्रकार घडला. या प्रकारानंतर पत्रकारांच्या आणि वृत्तसंस्थांच्या संघटनाकडून राहुल गांधी यांचा निषेध नोंदविला गेला. तसेच राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे. राहुल गांधी रोड शो दरम्यान पत्रकाराला त्याचे नाव विचारतात. पत्रकार त्याचे नाव शिवप्रसाद असल्याचे सांगतो. त्यानंतर राहुल गांधी त्याच्या मालकाचे नाव विचारतात. पण पत्रकार नाव सांगायला तयार होत नाही, त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते सदर पत्रकाराला धक्काबुक्की करत असल्याचे कळते. कारण त्यानंतर माईकवर राहुल गांधी म्हणतात, “त्याला मारू नका. आपल्याला मारहाण करायची नाही.”
पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात युवक मद्याच्या नशेत रस्त्यावर नाचताना पाहिले, राहुल गांधींची टीका
यानंतर राहुल गांधी सदर पत्रकाराला विचारतात, “तुमचा मालक ओबीसी आहे का? तो दलित आहे का? नाही ना.” सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सदर पत्रकाराने काँग्रेस कार्यकर्त्यांना त्याचा माईक काढू नका, असे सांगितले होते. तसेच या यात्रेचे वार्तांकन करू नये, असे राहुल गांधी यांना वाटतं का? असाही प्रश्न सदर पत्रकाराने विचारला होता.
या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपाच्या अनेक नेत्यांनी तो शेअर करून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार शलभमणी त्रिपाठी म्हणाले की, सदर पत्रकाराची चूक एवढीच होती की, तो काँग्रेस कार्यकर्त्यासारखा नाही तर पत्रकारासारखा वागला. इंडिया न्यूजकडूनही सदर प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणात कायदेशीर मार्ग तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. “राहुल गांधी यांनी आधी उपस्थितांना उकसवले आणि नंतर मारू नका म्हणाले. कुणाची जात विचारणे किंवा काही जातींचा चुकीच्या पद्धतीने उच्चार करणे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया इंडिया न्यूजच्या माजी कर्मचारी आणि आता संडे गार्डियनच्या प्रमुख ऐश्वर्या शर्मा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
काँग्रेसकडून मात्र या आरोपाचे खंडन करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ते पी. एल. पुनिया म्हणाले की, राहुल गांधी यांनी कोणत्याची जातीचा अवमान केला नाही. ते प्रत्येक सभेत आरक्षित गटातील जातीचे कमी प्रतिनिधित्व असल्याचा मुद्दा उपस्थित करत असतात. तसाच प्रयत्न अमेठीमध्येही झाला.