मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरून राज्यात वाद पेटला असतानाच केंद्र सरकारने मात्र हात झटकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे मत म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका नव्हे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून नागरिकांना जबरदस्तीने ‘भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती करण्यात आलेली नाही, असे सांगत नायडू यांनी गेल्या काही दिवसांत भाजप आणि संघनेत्यांनी केलेल्या वक्तव्यांपासून फारकत घेतली.
देवेंद्र फडणवीस, रामदेव बाबा, संघाचे भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यांसदर्भात विचारण्यात आले असता नायडू यांनी म्हटले की, मी त्यांच्याशी कोणताही करार केलेला नाही. केंद्र सरकारने अशाप्रकारचा कोणताही आदेश जारी केला आहे का?. लोकशाहीत अनेकांची आग्रही मते असू शकतात. मात्र, सरकारचा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक असतो. त्यामुळे काहीजणांची मते म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका नव्हे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, फडणवीस यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ घोषणेकडे राष्ट्रप्रेमाची अभिव्यक्ती म्हणून बघितले गेले पाहिजे, असा सल्ला नायडूंनी दिला. ‘भारत माता की जय’ ही केवळ हिंदू घोषणा नाही. भगतसिंग यांनी फाशीच्या स्तंभाकडे जाताना ही घोषणा दिली असल्याचे नायडूंनी म्हटले.