काँग्रेस पक्षाचे भारताबाहेरील प्रमुख सॅम पित्रोदा यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी वाद उफाळला आहे. भाजपाने या पोस्टवर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर पित्रोदा यांनी सदर पोस्ट डिलीट केली. सुधींद्र कुलकर्णी यांनी एका वृत्त संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखाची लिंक पित्रोदा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केली होती. ज्यात कुलकर्णी यांनी म्हटले की, संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे अधिक योगदान होते. या पोस्ट नंतर कुलकर्णी यांच्याप्रमाणेच सॅम पित्रोदाही भाजपाच्या निशाण्यावर आले.

सॅम पित्रोदा यांनी पोस्ट डिलीट केल्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांनी आपली भूमिका एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली. आपल्या भूमिकेवर मी ठाम असून माफी मागणार नाही, असे ते म्हणाले. “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो. त्यांनी हिंदू समाजात न्याय आणि समता आणण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक सुधारणांचे ते प्रणेते आहेत. पण मी ऐतिहासिक तथ्यांवर संविधान निर्मितीमध्ये आंबेडकरांपेक्षा नेहरूंचे अधिक योगदान होते, असे लिहिले. ज्या कुणी इतिहासाचे वाचन केले आहे, त्यांना माझा मुद्दा लक्षात येईल”, अशी भूमिका कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

सुधींद्र कुलकर्णी पुढे म्हणाले, “काँग्रेसनेच संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू केली होती. २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्य मिळावे, यासाठीचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून नेहरू संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.” हे सांगत असताना कुलकर्णी यांनी असेही नमूद केले की, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. कधीकाळी मी भाजपामध्ये होतो. माझ्या शब्दांना राजकीय रंग देऊन त्याच्यातून वेगळा अर्थ काढला जाऊ नये. तसेच आंबेडकर यांनी स्वतःच एकदा सांगितले होते की, हे माझे संविधान नाही, असा दावाही कुलकर्णी यांनी केला.

सुधींद्र कुलकर्णी यांचा तथाकथित दावा आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी त्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस आंबेडकर द्रोही असून त्यांचा डीएनए दलितविरोधी आहे, हे यातून सिद्ध होते, असेही ते म्हणाले. “राहुल गांधींचे काका सॅम पित्रोदा हे आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली, यावर प्रश्न उपस्थित करतात. कदाचित हे सॅम पित्रोदा यांच्या तोंडून आलेले शब्द असू शकतात, पण भावना मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची असू शकते. काँग्रेस आंबेडकर विरोधी आहे, हे ते वारंवार सिद्ध करतात. ही तीच काँग्रेस आहे, ज्यांनी नेहरूंच्या काळात दोन वेळा आंबेडकरांचा पराभव केला होता, असेही टिकास्र पुनावाला यांनी सोडले.

Story img Loader