एकीकडे विरोधकांकडून देशातील बेरोजगारीच्या समस्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे मोदी सरकारनं रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोजगार मेळावा’ योजनेचा भाग म्हणून तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. शिक्षक, प्राध्यापक, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने ‘रोजगार मेळावा’ या नावाने हा उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या सर्व नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक नियुक्त्या या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये अर्थात सीएपीएफमध्ये करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहविभागाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रोजगारासाठी प्राधान्य दिलं जात असून त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

दरम्यान, यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या संवादातून मोदींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की केंद्र सरकारनं तरुणांना सरकारी नोकरी देण्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. तरुण या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं कौशल्य वापरलं जावं, याला सरकारकडून प्राधान्य दिलं जात आहे. देशाच्या विकासामध्ये तरुणांचा हातभार लागावा यासाठी रोजगार मेळाव्याची मदत होईल”, असं मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rozgar mela pm narendra modi gave 75000 appointment letters video conferencing pmw
Show comments