आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून थेट भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. त्यापाठोपाठ सीमा हैदर भारताच्या राजकारणातही प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्था रिपाइंनं पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण दिल्याची माहिती रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासून किशोर यांनी दिली होती. त्यामुळे तिच्या राजकीय प्रवेशाची जोरजार चर्चा चालू असताना यासंदर्भात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
कोण आहे सीमा हैदर?
सीमा हैदर तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी तिच्या चार मुलांसह बेकायदेशीर मार्गांनी भारतात दाखल झाली. तिने आधी पाकिस्तानमधून नेपाळ आणि तिथून भारतात प्रवेश केला. ती पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचंही बोललं गेलं. त्यामुळे तिची चौकशी चालू असतानाच तिला बॉलिवूडमधून चित्रपटाची ऑफर आली. ‘टेलर मर्डर स्टोरी’ या चित्रपटात तिला भारतीय गुप्तहेराची भूमिका मिळाली आहे. मात्र त्यापाठोपाठ तिला रिपाइंमध्ये प्रवेशाची ऑफर मिळाल्याच्या वृत्तामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मासूम किशोर यांनी दिली ऑफर
सीमा हैदरला मासूम किशोर यांनी रिपाइंमध्ये येण्याची ऑफर दिल्याचं समोर आलं. “सीमा हैदर पाकिस्तानची नागरिक आहे आणि ती भारतात आली आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणांनी तिला क्लीन चिट दिली आणि तिला भारतीय नागरिकत्व मिळाले तर तिचं आम्ही आमच्या पक्षात स्वागत करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय नागरिकत्वाला कोठेही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे”, असं मासूम किशोर म्हणाल्याचं वृत्त समोर आलं.
सीमा हैदर लढवणार आगामी लोकसभा निवडणूक?
रामदास आठवलेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, या सर्व चर्चांवर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. “सीमा हैदरशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. ती पाकिस्तानमधून भारतात आली. इथे तिची ओळख सचिन मीनाशी झाली. ती तिच्या मुलांना घेऊन इथे आली आहे. मला वाटतं की तपास यंत्रणा तपास करत आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.
“मासूम किशोर यांनी मला न विचारता असं विधान केलं आहे. त्यामुळे सीमा हैदरला पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासंदर्भात संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. त्यांना तिकीट द्यायचंच असेल, तर ते भारतातून पाकिस्तानला जाण्यासाठीचं तिकीट आम्ही देऊ. पण पक्षाचं तिकीट देण्याचा प्रश्न नाहीये”, अशी ठाम भूमिका रामदास आठवलेंनी माध्यमांशी बोलताना मांडली.