नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता बिग बाजारने दिलासा दिला आहे. डेबिट कार्ड असणाऱ्यांना बिग बाजारमधून २ हजार रूपये काढता येईल. येत्या गुरूवारपासून (दि. २४) या सेवेस प्रारंभ होणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी बिग बाजार मिनी एटीएम सुरू करणार आहे. त्यासाठीची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. नागरिकांनी आपले डेबिट कार्ड स्वाईप करून पिन क्रमांक टाकून २००० रूपये घेता येतील. बिग बाजार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली. या निर्णयामुळे बँका व एटीएमसमोरील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. ३० डिसेंबर २०१६ नंतर ५०० व १००० रूपयांच्या नोटा चालणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याचबरोबर २००० आणि ५०० रूपयांच्या नव्या नोटा व्यवहारात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. तेव्हापासून बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. १३ दिवसांनंतरही ही गर्दी कमी होताना दिसत नाही. आपल्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांकडून बँकाच्या चकरा सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना एटीएममधून चार हजार रूपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून ४५०० रूपये करण्यात आली. परत त्यानंतर सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय बदलून ही मर्यादा २००० रूपयांपर्यंत आणण्यात आली. लोक गरजेपेक्षा जास्त पैसे काढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे, त्यांना अडीच लाख रूपये काढण्यास परवानगी देण्यात आली. परंतु त्यासाठीही काही अटी घालण्यात आल्या. हे पैसे आठ नोव्हेंबरपूर्वी जमा केलेले असावेत, वधू-वर किंवा त्यांचे आई-वडील हे पैसे काढू शकतात, वधू व वराच्या कुटुंबीयांना स्वतंत्रपणे अडीच लाख रूपये काढता येतील, पैसे काढण्यासाठी लग्न पत्रिका, लग्न खर्चासाठी आगाऊ पैसे दिलेल्या पावत्या तसेच हे लग्न ३० डिसेंबरपूर्वी झाले पाहिजे अशा भरपूर अटी लागू करण्यात आल्या आहेत.