सायबर गुन्हेगार हे अतिशय आधुनिक अशा रॅनसमवेअर व स्पिअर फिशिंग या तंत्रांचा वापर करीत असून इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यातून भारताला दरवर्षी २४,६३० कोटी रूपयांचा फटका बसत आहे, असे सायबर सुरक्षा क्षेत्रातील सिमँटेक या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
नॉर्टन-२०१३ या अहवालात म्हटले आहे की, भारतात ऑगस्ट २०१२ ते जुलै २०१३ या काळात सायबर गुन्ह्य़ांचा फटका बसलेल्यांची संख्या १९२ वरून २०७ झाली आहे. या अहवालानुसार सायबर गुन्ह्य़ांमुळे ऑगस्ट २०१२ ते जुलै २०१३ या काळात भारताला ४ अब्ज डॉलर म्हणजे २४६३० कोटी रूपयांचा फटका बसला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आर्थिक फटका ८ टक्के जास्त आहे. नॉर्टनच्या अहवालाुसार २४ देशातील १३००० प्रौढांना सायबर आर्थिक गुन्ह्य़ांना सामोरे जावे लागले असून त्यात भारतातील १००० प्रौढांचा समावेश आहे. सिमॅंटिक कार्पोरेशनचे विक्री व्यवस्थापक रितेश चोप्रा यांनी सांगितले की, अनेकदा होणाऱ्या सायबर हल्ल्यातून हे आर्थिक गुन्हे घडत असतात. सायबर गुन्हेगार रॅनसमवेअर व स्पिअर फिशिंग ही साधने वापरतात व त्यातून त्यांना आता जास्त पैसा मिळतो. ६६ टक्के लोक मोबाईल सेवेचा आर्थिक व्यवहारात वापर करतात त्यामुळेही अनेकदा जोखीम निर्माण होते.