घरातून ५० हजार आणि काही दागिने चोरीला गेल्याची तक्रार भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांनाच अडचणीत आणणारी ठरली आहे.
पोलीसांनी त्यांच्या घरात चोरी करणाऱया चोराला पकडले असून, त्याच्याकडे तब्बल एक कोटी १४ लाख रुपयांची रोकड, ६०० डॉलर्स, दोन सोन्याच्या चेन आणि इतर दागदागिने सापडल्यामुळे गिरिराज सिंह यांच्या पुढेच आता अडचण निर्माण झाली आहे. ही रोकड आणि दागदागिने आपण गिरिराज सिंह यांच्या घरातूनच चोरली असल्याचा जबाबही चोराने दिला आहे. त्यामुळे गिरिराज सिंह यांच्याकडेच आता पोलीसांना चौकशी करावी लागणार आहे.
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर गिरिराज सिंह यांच्याकडून पोलीसांकडे सोमवारी तक्रार नोंदविण्यात आली. त्यामध्ये ५० हजार रुपये आणि काही दागिने चोरीला गेल्याचा उल्लेख होता. खुद्द केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या घरात चोरी झाल्याचे समजताच बिहारमधील पोलीस यंत्रणा कार्यक्षमपणे कामाला लागली आणि त्यांनी एक दिवसातच चोराला जेरबंद केले. दिनेश कुमार असे पोलीसांनी पकडलेल्या आरोपी चोराचे नाव आहे. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केल्यावर त्याने घरातून हस्तगत केलेला सगळा ऐवज पोलीसांपुढे सादर केला. तो ऐवज पाहून पोलीसच चक्रावून गेले आहे. किरकोळ रोकड आणि दागिने चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर चोराकडे सापडलेला ऐवज पाहून पोलीसच बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्रीपर्यंत गिरिराज सिंह किंवा त्यांच्या नातेवाईकांनी पोलीसांकडे सापडलेली रोकड आणि ऐवजावर कोणताही दावा केला नव्हता.

Story img Loader