राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे धर्मांतराच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. जेव्हा लोकांना हे वाटू लागतं की समाज आपल्या सोबत नाही तेव्हा मिशनरी त्या परिस्थितीचा फायदा उचलतात असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. गोविंदनाथ महाराज समाधी उत्सव होता त्यावेळी झालेल्या मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हटलं आहे मोहन भागवत यांनी?
“अनेक लोक सोयी, सुविधांपासून वंचित असतात. तेव्हा आपले लोक अशा लोकांच्या जवळ जात नाहीत. मात्र हजारो मैलांवरून आलेले काही मिशनरी या ठिकाणी येतात. त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा करतात, त्यांना भोजन देतात. त्यांची भाषा बोलतात. त्यानंतर त्यांना हळू हळू धर्मांतराकडे वळवतात. १०० वर्षांपूर्वी काही लोक सगळं काही बदलण्यासाठी भारतात आले. धर्मांतराचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र आपल्या संस्कृतीशी आपल्या पूर्वजांशी असलेली आपली नाळ ही घट्ट जोडली गेली आहे. ही नाळ तोडण्याचा प्रयत्न अशा लोकांकडून केला जातो.” असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
धोकेबाज लोकांपासून सावध रहा
“धोकेबाज लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. लोकांचा विश्वास आपल्या धर्मावरून उडावा या अनुषंगाने काही प्रश्न हे असले लोक विचारतात. समाजात अनेक लोक असे असतात ज्यांना वाटतं की आपली कदर आपल्या समाजाला नाही. अशा लोकांनाच हे मिशनरी हेरतात आणि त्यांना धर्मांतराकडे वळवतात. अशा धोकेबाज लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. लोकांच्या मनात आपल्याच लोकांविषयी शंका उत्पन्न होते हे कसं रोखता येईल? यावर आपण सगळ्यांनीच लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.” असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
भारताची ताकद जगभरात वाढते आहे ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मात्र आपल्याला हिंदू धर्म वाचवायचा आहे. आपण एक संयुक्त समाज म्हणून ओळखले जात होतो. मात्र नंतर आपणच जाती आणि वर्ग व्यवस्था आणली त्यामुळे आपल्या समाजातच मतभेदांच्या भिंती उभ्या राहिल्या. याचा फायदा बाहेरच्या देशातले लोक घेऊ लागले. आपल्यातले मतभेद कसे वाढतील आणि आपण धर्माच्या नावावर कसे विभागले जाऊ हे काम मिशनऱ्यांनी सोयीस्कर रित्या केलं असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला आपली एकजूट कायम ठेवावी लागेल असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.