RSS Chief Mohan Bhagwat On Muslims : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या संघात मुस्लीम व्यक्ती सहभागी होऊ शकते का किंवा संघाच्या शाखेत जाऊ शकते का? असा प्रश्न विचारल्यानंतर भागवत यांनी त्यावर दिलेल्या उत्तराची बरीच चर्चा होत आहे. भागवत यांनी रविवारी (७ एप्रिल) दिल्लीतल्या लाजपत नगर पार्कमधील संघाच्या प्रताप शाखेला भेट दिली. येथे संघ स्वयंसेवकांना संबोधित केल्यानंतर भागवत यांनी स्वयंसेवकांशी बातचीतही केली.
यावेळी विजय वर्मा नावाच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने भागवत यांना संघाच्या शाखेत मुस्लीम व्यक्तींच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर भागवत म्हणाले, “सर्व जाती, धर्म व समुदायांमधील लोक संघाच्या शाखेत सहभागी होऊ शकतात. केवळ औरंगजेबाच्या वंशजांना इथे प्रवेश नाही. संघ स्वयंसेवकांसह सर्वांनी अखंड राष्ट्र, एकजुट राष्ट्रासाठी काम करायला हवं.”
मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
मोहन भागवत म्हणाले, “मुस्लीमसुद्धा आमचेच आहेत असं आम्ही मानतो. सर्वांना एकत्र करून राष्ट्रनिर्मिती करावी, त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आमचं मत आहे. संघाच्या शाखेत सर्व पंथ, धर्म, समुदायातील लोकांचं स्वागत आहे. परंतु, आमची एकच अट आहे. शाखेत येणाऱ्या सर्वांना ‘भारत माता की जय’ बोलावं लागेल. त्यांना भगव्या ध्वजाप्रति आदर राखावा लागेल. अशा लोकांसाठी संघाचे दरवाजे खुले आहेत. जे लोक स्वतःला औरंगजेबाचे वंशज मानत नाहीत त्या सर्व भारतींयांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत स्वागत आहे.”
मोहन भागवतांच्या उत्तरानंतर विजय वर्मा म्हणाले, “आम्ही निश्चय करतो की संघाच्या शाखेत आम्ही मुसलमानांना जोडू. मी माझ्या संपर्कातील सर्वा मुस्लीम मित्रांना संघाच्या शाखेत येण्यासाठी आमंत्रित करणार आहे. राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी मानून जो कोणी संघाच्या शाखेत येऊ इच्छित असेल त्याचं आम्ही स्वागत करू.”
पाकिस्तान व बांगलादेशमधील स्थितीवर टिप्पणी
दरम्यान, आरएसएस प्रमुख भागवत यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान व बांगलादेशमधील स्थितीवर टिप्पणी केली. ते म्हणाले, “भारतातील विविध धर्माच्या लोकांच्या पूजा-प्रार्थना करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी आपली संस्कृती एकच आहे. कठीण काळात अखंड भारताचा काही भाग आणि त्याबरोबर काही लोक भारतापासून वेगळे झाले. मात्र, आज त्यांची काय दशा झाली आहे ते आपण पाहतो आहोत. ती स्थिती जगापासून लपून राहिलेली नाही. ते लोक आज आपल्याबरोबर असते तर आज त्यांची ही अवस्था झाली नसती.