ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे.

“कशाला वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,” अशी विचारणा मोहन भागवत यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केलं.

Gyanvapi Row: नंदीपासून ८३ फुटांवर ‘शिवलिंग’; भिंतींवर त्रिशूल आणि हत्तीचं चिन्हं; ज्ञानवापीमधील आणखी एक व्हिडीओ समोर

अयोध्या आंदोलनातील सहभाग हा अपवाद हे आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केलं असल्याचं मोहन भागवतांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, “ऐतिहासिक कारणांमुळे रामजन्मभूमी मोहिमेत सहभागी झालो आणि ते पूर्ण केलं असल्याचं ९ नोव्हेंबरला आम्ही सांगितलं होतं. पण यापुढे आम्हाला कोणत्याही मोहिमेचं नेतृत्व करायचं नाही आहे”.

ज्ञानवापीच्या मशिदीवरील प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “सध्या ज्ञानवापीचा मुद्दा गाजत आहे. आपण इतिहास बदलू शकत नाही. आपण तो इतिहास लिहिलेला नाही, ना सध्याच्या हिंदूंनी, ना मुस्लिमांनी. हे सर्व भुतकाळात झालं आहे”.

‘ज्ञानवापी’कडून ज्ञान-सागराकडे!

यावेळी ते असंही म्हणाले की, “जेव्हा भारतीयांचं मनोधैर्य खच्ची करण्याच्या हेतूने इस्लाम आला तेव्हा हजारो मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली”. तसंच त्यांनी स्पष्ट केलं की, “हीदेखील (नमाज) एक पूजाच आहे. ते आपल्या पूर्वजांचे वंशज आहेत. आपण कोणत्याही पूजेविरोधात नाही”.

यावेळी मोहन भागवत यांनी ज्ञानवापी प्रकरणात जे सहभागी आहेत त्यांनी एकत्र बसून सहमतीने तोडगा काढला पाहिजे असा सल्ला दिला. “पण दरवेळी असं होत नाही आणि लोक कोर्टात दाद मागतात. त्यामुळे कोर्टाने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे. त्यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये,” असं मोहन भागवतांनी सांगितलं.

हिंदूंनी खूप सहन केले

हिंदूंनी खूप सहन केले, देशाचा तुकडासुद्धा गमावला. हिंदूंना कोणाला जिंकायचे नाही, हरवायचे पण नाही. भीती दाखवायची नाही, पण घाबरायचेही नाही. तरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल, असेही भागवत यांनी नमूद केले.