शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यामध्ये वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. बाबासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रामधून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पुरंदरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

नक्की पाहा >> Video: १०० व्या वाढदिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणालेले, “आयुष्याची आणखी २-३ वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की…”

“पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. दादरा नगर-हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून ते ही लढले होते,” असं भागवत यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरेंचं निधन : श्रद्धांजली वाहताना अमोल कोल्हे म्हणाले, “माझ्या पिढीला जी गोष्ट दिसली त्यामध्ये…”

“छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच ‘जाणता राजा’ सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील,” अशी भावनिक शब्दांमध्ये मोहन भागवत यांनी पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : गडकरी हळहळले तर नारायण राणे म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”

मोदींनीही वाहिली श्रद्धांजली….
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्तानंतर श्रद्धांजली अर्पण केलीय. बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचं मोदींनी म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

Story img Loader