सरसंघचालक मोहन भागवत हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने देशातील धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक सौहार्दाविषयी भूमिका मांडताना दिसत आहेत. गुरुवारी नागपुरात रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांनी देशातील धार्मिक स्थिती आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक घटनांचेही दाखले दिले. “भारतात लोकशाही असल्यामुळे राजकीय मतभेद. सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र, सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेत विसंवाद निर्माण होणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा”, असा सल्लाही त्यांनी राजकीय नेतेमंडळींना यावेळी दिला.
“हिंदू-मुस्लीम ऐक्य देशाच्या विकासासाठी आवश्यक”
मोहन भागवत यांनी यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्य देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. “काही संप्रदाय बाहेरून आले होते. त्यांना आणणाऱ्या बाहेरच्या लोकांशी आपल्या लढाया झाल्या. पण आता ते बाहेरचे आक्रमक लोक निघून गेले आहेत. आता सगळे आतले लोक आहेत. त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांचे संबंध विसरून या देशात राहा. अजूनही जे लोक त्या बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, तेही बाहेरचे नसून आपलेच आहेत, असं समजून त्यांच्याशी आपण चांगलं वर्तन करायला हवं. जर त्यांच्या विचार करण्यात काही कमतरता आहे, तरक त्यांचं प्रबोधन करणं आपली जबाबदारी आहे”, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.
“…म्हणून आपण एकत्र येत नाही”
दरम्यान, भारतात हिंदू-मुस्लीम एकत्र का येत नाहीत, याचं कारण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. “आपले अहंकार आणि भूतकाळाचं ओझं आपण वागवत असल्यामुळे आपल्याला एकत्र येण्याची भीती वाटते. आपल्याला असं वाटतं की जर सगळ्यांच्या असणाऱ्या या मातृभूची पूजा करण्यात जर आपण गुंतलो, तर आपल्या वैयक्तिक ओळखी पुसल्या जातील. वेगळी ओळख कुणाला हवी आहे? इथे स्वतंत्र ओळखी नाहीयेत. भारतात आपली स्वतंत्र ओळख सुरक्षित आहे. पण बाहेर जर तुम्ही देशाची जी मूळ ओळख आहे, तिच्यापासून स्वतंत्र राहाल, तर तुम्हाला सुखी आयुष्य व्यतीत करणं कठीण होऊन बसेल”, असंही ते म्हणाले.
नागपूर: सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना विवेक बाळगा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा राजकीय पक्षांना सल्ला
“आपण वादापेक्षा संवादावर भर द्यायला हवा. आपली विविधता ही आपल्यातली फूट नसून ऐक्य आहे”, असंही मोहन भागवत यांनी यावेळी नमूद केलं.
“कधीकाळी स्पेनपासून मंगोलियापर्यंत समस्त जगाला इस्लामी राजवटींच्या हल्ल्यांची भीती होती. पण हळूहळू लोक जागृत होऊ लागले, त्यांनी लढा दिला आणि आक्रमण करणाऱ्यांना पराभूत केलं. यामुळे इस्लमा त्यांच्या मूळ ठिकाणापुरताच मर्यादित झाला. आक्रमणकर्ते निघून गेले. आता भारतातला इस्लाम हा सर्वाधिक सुरक्षित आहे. हिंदू-मुस्लिमांमधलं हे शांततापूर्ण ऐक्य गेल्या कित्येक शतकांपासून इथे आहे”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.
“प्रार्थनेच्या आपल्या पद्धती वेगळ्या असतील, पण आपण या देशाचे आहोत. आपले पूर्वजही याच देशाचे होते. आपण हे वास्तव का स्वीकारू शकत नाही आहोत?” असा प्रश्नही मोहन भागवतांनी उपस्थित केला आहे.