हिंदू समाजाला धोका असला, तर संपूर्ण देश धोक्यात येईल, असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व हिंदूंच्या एकतेवर भर दिला.
भारत हे हिंदुराष्ट्र असल्यामुळे या देशाचे संवर्धन करण्यासाठी, तसेच देशाचे आपल्यावर असलेले उपकार फेडण्यासाठी सर्व हिंदूंनी एक होण्याची हिंदू समाजाची जबाबदारी आहे. भारतात हिंदू समाज धोक्यात आला, तर देशच धोक्यात येईल, असे भागवत यांनी येथे तीन दिवस चाललेल्या कार्यकर्ता शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना सांगितले.
‘विविधतेत एकता’ हे देशाचे वैशिष्टय़ असून, समाजातील प्रत्येकाला समान आदर दिला जायला हवा. सर्व हिंदू एकत्र आले, तर या देशाला प्रगती करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.
‘विश्वगुरू’ असे वर्णन केला जाणारा भारत इतिहासात जगाचे नेतृत्व करत होता आणि त्या काळात जगात शांतता नांदत होती, असे भागवत म्हणाले. राष्ट्राला परमोच्चस्थानी नेण्याचे ‘पवित्र कार्य’ पुन्हा करण्यासाठी हिंदू समाजाला एकत्र येऊन आपली ताकद वाढवायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
संघ ही राष्ट्रउभारणी करणारी, तसेच देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारी संघटना आहे. संघाने हे पवित्र कार्य अंगीकारले असून ते पूर्ण होईपर्यंत आम्ही ते सुरूच ठेवू, असे भागवत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. बाहेरून पाहून संघ कळणार नाही. त्यामुळे लोकांनी आधी संघाचे अंतर्गत कार्य पाहावे आणि ते चांगले वाटले, तर संघात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक वर्षांच्या गैरसमजानंतर संघाने केलेले काम लोकांना कळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा