राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. हरिद्वारमध्ये बोलताना ते म्हणाले की, “संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल”.
मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटलं की, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार?”.
“सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचंही आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता आणि झोपूनच राहिला असता,” असं मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलं. धर्माचं उत्थान होईल तरच भारताचं उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील असंही ते म्हणाले आहेत. मोहन भागवत यांच्या हरिद्वार दौऱ्यात काही संतांनी त्यांच्याकडे देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.
१५ वर्ष नाही १५ दिवसात करा – संजय राऊत
मोहन भागवत यांनी अखंड भारतासंबंधी केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करु सांगताना १५ वर्ष नाही १५ दिवसात करा असंही म्हटलं.
“अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली. अखंड हिंदुस्थान जरुर करा पण आधी काश्मिरी पंडितांची घऱवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.