राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत शुक्रवारी एका भाषणादरम्यान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही पाकिस्तानमधील लोक आनंदी नाहीत. आता त्यांना मान्य आहे की, भारताची फाळणी ही एक चूक होती. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. देशाच्या विविध भागातील सिंधी समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भागवत म्हणाले, अखंड भारत हेच सत्य आहे, खंडित भारत एक दु:स्वप्न आहे. भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र पाकिस्तानला सात दशकांहूनही अधिक काळ लोटला तरी तिथले लोक दुःखी आहेत. परंतु भारतात सूख आहे. क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधी समुदायाला भागवत संबोधित करत होते. यावेळी भागवत म्हणाले की, आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे.
भागवत म्हणाले की, ज्याला आपण पाकिस्तान म्हणतोय तिथले लोक म्हणतायत त्यांची चूक झालीय. त्यांच्या कट्टरतेमुळे ते भारतापासून वेगळे झाले, संस्कृतीपासून वेगळे झाले. पण ते आता सुखी आहेत का? इथे (भारतात) सुख आहे आणि तिथे (पाकिस्तानात) दु:ख आहे. कारण जे योग्य आहे ते टिकतं आणि चुकीचं आहे ते संपतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तयार राहा, कसं होईल, काय होईल हे मला माहिती नाही. भारतानं पाकिस्तानवर आक्रमण करावं असं मला वाटत नाही. कारण आपण आक्रमणकारी नाही आहोत. तशी आपली संस्कृती नाही.