Mohan Bhagwat Speaks on Pahalgam Attack: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या वृत्तीला ठेचलंच पाहिजे, अशा प्रकारच्या भावना सर्वच स्तरातून उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही इतर देशांकडून भारताच्या पाठीशी ठाम असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला व त्यावर भारताची भूमिका यासंदर्भात भाष्य केलं आहे.

पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिन सोहळ्याच्या निमित्ताने विलेपार्ले येथे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणात पहलगाम हल्ला व त्यावर देशभरात व्यक्त होणारा संताप यावर त्यांनी मत व्यक्त केलं. यावेळी हिंदू धर्म हाच मानवधर्म असल्याचंही ते म्हणाले.

पहलगाम हल्ल्याबाबत काय म्हणाले मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी यावेळी जगात एकच धर्म असून तो मानल धर्म असल्याचं म्हटलं. “जगात एकच धर्म आहे.. मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून त्याला मारलं नाहीये. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळे देश बलवान पाहिजे”, असं ते म्हणाले.

“आमच्या मनात क्रोध आहे”

“आपल्या मनात दु:ख आहे. सगळ्यांचच अंत:करण जड आहे. सगळ्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे. तो असला पाहिजे. असुरांचं निर्दालन व्हायचं असेल, तर अष्टादश भुजांची शक्ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करण्याचे सृष्टीचे जे मार्ग आहेत, त्यात एक मार्ग समजावून देण्याचा असतो. अनुभवातून मनुष्य शिकतो आणि सुधारतो. काही लोक असे असतात जे सुधरतच नाही. जे शरीर, मन त्यांनी धारण केलंय, त्यात परिवर्तन शक्य नसतं”, असं म्हणत मोहन भागवत यांनी आक्रमक भूमिकेचं समर्थन केलं.

“दुष्टांचं निर्दालन झालं पाहिजे”

दरम्यान, यावेळी मोहन भागवत यांनी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केल्याचं उदाहरण दिलं. “रावण शिवभक्त होता, वेदशास्त्रसंपन्न होता. एक चांगला माणूस बनण्यासाठी जे काही आवश्यक असतं, ते सगळं त्याच्याकडे होतं. पण जे शरीर-मन-बुद्धी त्याची बनली, ती बदलायला तयार नव्हती. दुसरा उपायच नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा देह धारण करत नाही त्याशिवाय तो सुधारणार नाही. त्यामुळे रावण सुधारला पाहिजे. म्हणून रामानं त्याचा वध केला. अशा दुष्ट माणसांचं निर्दालन झालं पाहिजे. क्रोध आहे, अपेक्षाही आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं मला”, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांनी त्यांच्या या भूमिकेला टाळ्या वाजवून समर्थन दिलं.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या विधानाचा केला उल्लेख

“७५ वर्षं होऊन गेली. पण परवा पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांनी पुन्हा द्विराष्ट्रवादाची थिअरी मांडली. हे लक्षात आलं पाहिजे. सगळं जग एक कुटुंब आहे. कोणताही पंथ, संप्रदाय असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जातो. एकाच सत्याकडे तो नेतो”, असं ते म्हणाले.

“द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. पण मार खाणं हाही आपला स्वभाव नाही. शक्तीवान माणसाला अहिंसक असायला हवं. जो दुर्बल आहे, त्याला हे व्हायची गरजच नाही. त्याला व्हावंच लागतं अहिंसक. म्हणून शक्ती असायला हवी. ती दिसलीही पाहिजे, म्हणजे जगाला कळतं हे शक्तीवान आहेत, यांच्या वाट्याला जाऊ नये. मग जगातल्या दुष्ट लोकांनाही हे समजतं”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका मांडली.