राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे. काश्मिरी पंडितांना कट्टरतावादामुळे काश्मीर सोडावं लागलं असलं तरी आता जेव्हा ते पुन्हा परत येतील तेव्हा त्यांना पुन्हा विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असा इशारा मोहन भागवत यांनी दिला. ते श्रीनगरमधील नवरेह उत्सवात (Navreh Mahotsav) बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, “काश्मिरी पंडित गेली ३-४ दशके आपल्याच देशात आपल्या घरातून विस्थापित होण्याचा आघात सहन करत आहेत. या परिस्थितीत आपण पराभव स्वीकारू नये आणि आव्हानांना सामोरे जावे. हेच अत्यावश्यक आहे.”
“सामूहिक प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० शिल्लक नाही”
“यापूर्वी मी म्हणालो होतो की काश्मिरी पंडितांचा प्रश्न जनजागृतीतून आणि कलम ३७० सारखे अडथळे हटवून सोडवला जाईल. २०११ नंतर या ११ वर्षांत आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० शिल्लक नाही,” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.
हेही वाचा : …मग मोहन भागवतांच्या नावापुढे ‘खान’ लावणार आहात का?; उद्धव ठाकरेंची भाजपाला विचारणा
“…तेव्हा काश्मिरी पंडितांना विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही”
“कट्टरतावादामुळे काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडले, पण आता परत येताना ते हिंदू आणि ‘भारतभक्त’ म्हणूनच येतील. यावेळी त्यांना सुरक्षिततेची आणि उपजीविकेची हमी असेल. ते अशाप्रकारे जगतील की त्यांना विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही,” असा इशाराही भागवत यांनी दिला.