भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए एकच आहे. एवढेच काय म्यानमार ते अफगाणिस्तान पर्यंत जे विविध समूह राहतात त्या सगळ्यांचे पूर्वज एकच होते असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. रायपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. अफगाणिस्तान, श्रीलंका, तिबेट, म्यानमार येथील नागरिकांचे भारताशी सहज नाते जुळते कारण सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
Afghanistan se Burma tak aur Tibet se Sri Lanka tak, jitne jansamuh rehte hain, utne jansamuh ka DNA yeh bata raha hai ki unke purvaj samaan hain. Yeh humko jodne waali baat hai. Hum samaan purvajon ke vansaj hain: RSS chief Mohan Bhagwat in Raipur #Chhattisgarh pic.twitter.com/MdRkCzhyk8
— ANI (@ANI) January 15, 2018
सध्या परिस्थिती अशी आहे की आपण नाती विसरत चाललो आहोत. एकमेकांचे गळे धरून एकमेकांशी भांडत आहोत. आपल्या सगळ्यांचे घर एकच आहे हे सोयीस्करपणे विसरतो आहोत. आपल्या सगळ्यांचे पूर्वज एकच होते. गो रक्षा कशासाठी? सेंद्रीय शेती कशासाठी? ग्राम विकास का? असे प्रश्न सगळ्यांना पडतात.. मात्र त्याचे उत्तर हेच आहे की जे देशाच्या संस्कृतीपासून लांब गेले आहेत त्यांना जवळ आणले पाहिजे. भारत हा महान संस्कृती असलेला देश आहे. या देशात सामाजिक विषमता मिटली पाहिजे. जातीभेदाच्या भिंती पाडून टाकल्या पाहिजेत असेही मत भागवत यांनी व्यक्त केले.
भारत हा स्त्री शक्तीचे महत्त्व सांगणारा देश आहे. आदिवासी बांधवांसाठी राणी दुर्गावतीने बलिदान दिले होते. मात्र आज त्यांची अवस्था बिकट आहे. आदिवासी समाज शोषित आहे. निष्पाप आदिवासी समाजाला काही राष्ट्रविरोधी शक्ती त्यांच्याकडे आकर्षून घेत आहेत असेही मत भागवत यांनी मांडले. भारतात राहणारे सगळेच लोक हिंदू आहेत, असे वक्तव्य भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. या वक्तव्याचा पुनरूच्चार त्यांनी रायपूरच्या कार्यक्रमातही केला. तसेच जगाला सन्मार्गावर घेऊन जाण्यासाठीच भारताची निर्मिती झाली आहे असेही मत मोहन भागवत यांनी मांडले.