‘पांचजन्य’मधील लेखाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त केली होती. मात्र या लेखाचा संघाशी संबंध जोडू नये, असे संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने मात्र या लेखावरून संघाला लक्ष्य केले आहे.

एक भारतीय कंपनी म्हणून ‘इन्फोसिस’चे देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या वेब पोर्टलशी संबंधित काही मुद्दे असू शकतात, मात्र ‘पांचजन्य’ मध्ये या संदर्भात जो लेख प्रकाशित झाला आहे, ती त्या लेखकाची व्यक्तिगत मते आहेत, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नाही असे त्यांनी म्हटले आहे. प्राप्तिकर किंवा जीएसटी पोर्टलमध्ये काही अडचणी असू शकतात, मात्र त्याबाबत चर्चा करण्यासाठी संघ हे व्यासपीठ नाही, असे संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नमूद केले. या पूर्वीही संघाने ‘पांचजन्य’ हे आपले मुखपत्र नाही असे स्पष्ट केले होते.

‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे तसेच ‘टुकडे टुकडे टोळीला’ मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटले आहे. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्तिकर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे. ही दोन्ही पोर्टल ‘इन्फोसिस’ने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप ‘पांचजन्य’मध्ये आहे. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या मोठय़ा कंपनीला संघ समर्थक साप्ताहिकाने लक्ष्य केले आहे.

‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या दोन्ही पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते आणि गुंतवणूकदार यांची गैरसोय होते. परिणामी, देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो, अशी टीका या लेखात करण्यात आली आहे. ‘इन्फोसिस’च्या प्रवर्तकांपैकी एक असलेले नंदन निलेकणी यांनी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. तर या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या विचारधारेला असलेला विरोध लपून राहिलेला नाही, असा उल्लेखही या लेखात आहे.

कारवाईची काँग्रेसची मागणी

मुंबई : देशाचा विकास आणि प्रगतीमध्ये मोठे योगदान असलेल्या इन्फोसिस कंपनीविरोधात पुराव्याअभावी बेफाम आरोप करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्राविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे देशासाठी मोठे योगदान आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Story img Loader