२००४ च्या लोकसभा निवडणुकांआधी देशभरामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट होता असा धक्कादायक दावा संघटनेमध्ये प्रचार म्हणून काम करणाऱ्या यशवंत शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये १९९५ सालापासून प्रचारक म्हणून काम करणाऱ्या शिंदेंचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने देशाविरोधात कट रचणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या यशवंत शिंदे यांनी दिलेल्या कबुली जबाबामध्ये संघाच्या देशविरोधी कारवायांसंदर्भात धक्कादायक माहितीवर प्रकाश टाकला आहे. संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, त्यामध्ये कोणकोण सहभागी आहे याहून मोठी ब्रेकिंग न्यूज काय असू शकते?” असा प्रश्न विचारत पवन खेरा यांनी यशवंत शिंदेंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरुन हाच व्हिडीओ कोट करुन रिट्विट करताना, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक यशवंत शिंदे यांनी संघाकडून केल्या जाणाऱ्या देशाविरोधातील कारवायांबद्दल केलेल्या दाव्यांची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. निवडणूका जिंकण्यासाठी देशाविरोधात कट रचणारे राष्ट्रवादी नसतात. या कटातील प्रत्येक व्यक्तीविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ती संघासाठी काम करायची असं सांगताना दिसत आहे. “मी यशवंत शिंदे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १९९५ साली जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारक होतो. अनेक वर्ष बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि संघाचं काम पाहिलं. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम केली. २००६ साली नांदेडमध्ये जो बॉम्बस्फोट झाला. त्या प्रकरणात मी काल २९ ऑगस्ट रोजी विशेष न्यायालयामध्ये हजर राहून मला साक्षीदार करावे म्हणून विनंती केली. न्यायालयाने माझा अर्ज स्वीकारला. त्यांनी सरकारी वकील तसेच या खटल्यातील आरोपींना नोटीस पाठवली आहे,” असं व्हिडीओमधील व्यक्ती सांगताना दिसत आहे.
“पुढील महिन्यात २२ तारखेला मी काल सादर केलेल्या मुकदम्यावर ते त्यावर मत मांडतील. या प्रकरणात जे आरोपी पकडले गेले आहेत ते मैदानातील आहे. मूळ आरोपी ज्यांनी कट रचला ते अजून बाहेर मोकाट फिरत आहेत. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीच मूळ आरोपींना हात लावला नाही. त्यांनीच त्यांना मोकळे सोडले आहेत. त्यातील मूळ आरोपी आहे मिलिंद परांडे. हा आज अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचा राष्ट्रीय संघटक आहे. २००३-०४ च्या सुमारास तो महाराष्ट्रात संघटक होता. त्यानेच माझ्याकडून सुपारी घेऊन २००३ ला बॉम्बस्फोट करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम हाती घेतलं होतं. २००४ च्या लोकसभा निवडणुकीआधी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट होता,” असं व्हिडीओतील व्यक्ती म्हणता दिसत आहे.