राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आता औरंगजेब प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसंच वक्फ प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. सरकार यासंदर्भात योग्य दिशेने काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी
१४ फेब्रुवारी या दिवशी देशभरात छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर औरंगजेब हा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेत आला. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली आहे. तसंच इतरही हिंदुत्ववादी संघटना यासाठी आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्रात हा विषय ताजा असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनीही या विषयावर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले दत्तात्रय होसबळे?
समाजात कुठलाही विषय समोर येऊ शकतो. औरंगजेब मार्गाचं नाव बदलून ते अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलंच. जे लोक गंगा आणि यमुना यांचा आदर करतात अशा लोकांनी औरंगजेबाला त्यांचा आयकॉन बनवलं. असे लोक औरंगजेबाच्या भावाविषयी काहीही बोलत नाहीत. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श ठरावयचं की इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान करायचा हा खरा प्रश्न आहे. असं दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलं आहे.
औरंगजेब या विषयावर आणखी काय म्हणाले होसबळे?
आक्रमक मानसिकतेचे लोक भारतासाठी संकट आहेत. अशाच प्रवृत्तीचे लोक औरंगजेबाचं महत्त्व वाढवत आहेत. अशी थेट भूमिका होसबळे यांनी मांडली त्याचप्रमाणे त्यांनी वक्फबाबतची त्यांची मतं मांडली आहेत. वक्फबाबत ज्या चर्चा सुरु आहेत त्या समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच अयोध्येत झालेलं राम मंदिर हे फक्त संघ नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रयत्नांचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले आहेत.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्या विरोधात आम्ही संघाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अन्याय, त्यांच्या विरोधात कट करुन केली जाणारी हिंसा, त्यांच्यावरचे अन्याय तसंच शोषण याबाबत आम्ही निषेध नोंदवला आहे हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि एकजूट करुन राहिलं पाहिजे असंही होसबळेंनी म्हटलं आहे.
कोण आहेत दत्तात्रय होसबळे?
दत्तात्रय होसबळे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. अभाविप या विद्यार्थी संघटनेद्वारे त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. दोन दशकं त्यांच्यावरर संघटन महामंत्री ही जबाबदारी होती. आता ते संघ सरकार्यवाह म्हणून संघात कार्यरत होते. होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना पाटण्याहून लखनऊला बोलावण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.