भारतावर झालेल्या मुस्लिम आक्रमणांमुळे हिंदू समाजात बालविवाह, सती जाणं हे सुरु झालं. विधवा पुनर्विवाहावर निर्बंध आले. महिलांना शिकवायला नको ही मानसिकता तयार झाली असा आरोप आता संघाचे विचारवंत कृष्ण गोपाल यांनी केला. रविवारी दिल्ली विद्यापीठाच्या कार्यक्रमात नारी शक्ती संगम कार्यक्रमात कृष्ण गोपाल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या कार्यक्रमात त्यांनी महिला सशक्तीकरण या मुद्द्यावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मुस्लिम आक्रमणांमुळे महिलांवर निर्बंध लादले गेले असा आरोप केला.
१२ व्या शतकाच्या आधी महिला स्वतंत्र होत्या. भारतीय समाजाच्या जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. एवढंच नाही आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की घरात स्वयंपाक घराची जबाबदारी सांभाळणं हे एखाद्या महिलेने वैज्ञानिक होण्याइतकंच महत्त्वाचं आहे.
मुस्लिम आक्रमणांमुळे स्त्रियांची अवस्था वाईट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल यांनी या चर्चा सत्रात मध्ययुगातील महिलांच्या स्थितीवर चर्चा केली. तसंच ते म्हणाले की आपल्या देशावर इस्लामची आक्रमणं मोठ्या प्रमाणावर झाली. तसंच आपला देश दीर्घ काळ पारतंत्र्यात होता. या काळात मंदिरं तोडली गेली, विद्यापीठं उद्ध्वस्त करण्यात आली. तो काळ महिलांसाठी सर्वात धोकादायक काळ होता. लाखो महिलांचं अपहण करुन त्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारात सौदा करण्यात आला. अहमद शाह अब्दाली, मोहम्मद घोरी, गझनीचा मोहम्मद या सगळ्यांनीच भारतातल्या स्त्रियांना बाहेरच्या देशात विकलं होतं. तो काळ हा महिलांसाठी सर्वाधिक कठीण आणि अपमान सहन करावा लागलेला काळ होता. त्या काळात स्त्रिया सुरक्षित रहाव्यात म्हणून निर्बंधाच्या बेड्यांमध्ये त्यांना अडकवण्यात आलं.
विधवा विवाहावर निर्बंध नव्हते
कृष्ण गोपाल यावेळी म्हणाले की राम आणि कृष्ण यांचा विवाहही एका विशिष्ट वयानंतर झाला होता. मात्र मुस्लिम आक्रमणांमुळे बालविवाहांची प्रथा सुरु झाली. एवढंच काय मुस्लिम आक्रमणांच्या आधी भारतात सती प्रथाही नव्हती. मुस्लिम पुरुषांच्या हाती लागू नये म्हणून जोहार, सती यांसारख्या प्रथा सुरु करण्यात आला. देशात मुस्लिम आक्रमणं सुरु होण्याआधी विधवांच्या पुनर्विवाहांवरही काहीही निर्बंध नव्हते.
काळाच्या ओघात महिलांमध्ये निरक्षरता वाढली. तसंच बालविवाहाची प्रथा सुरु झाली आणि विधवांचे पुनर्विवाह होण्याचं प्रमाण जवळपास संपलं. आपल्या समाजाने ही बंधनं, हे नियम खुशीने स्वीकारले नव्हते. त्यावेळी जे संकट आलं होतं त्यापासून वाचण्यासाठी हे नियम लादावे लागले होते असंही कृष्ण गोपाल यांनी स्पष्ट केलं.
१२ वं शतक ते १८ वं शतक या कालावधीत महिलांनीही समाजाच्या जडणघडणी एक मोठी भूमिका निभावली. १३ व्या शतकात संत रामानंद यांच्या आश्रमात महिला शिष्याही होत्या. संत रामानंद हे कबीर आणि रविदास यांचे गुरु होते. त्यांच्या काळातल्या स्त्रियांनी समाज सुधारणेवर भर दिला होता. अनेक स्त्रिया संतपदालाही पोहचल्या होत्या.
सध्या आपल्या देशावर पाश्चिमात्य देशांचा प्रभाव पडल्याचं दिसतं. आपल्या देशातल्या महिलांना पाश्चिमात्य प्रभावापासून सावध रहावं लागेल. आपल्याला आणखी प्रगती करावी लागेल. स्त्रिया आज विमान चालवतात, जहाजावर असतात, वैज्ञानिक आणि डॉक्टर म्हणूनही कार्यरत आहेत. तसंच त्या घरही चालवतात. एक घर घडवण्याचं काम स्त्रिया करतात असंही गोपाल यांनी म्हटलं आहे.