ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या राजकीय पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिर लोकार्पणावरून इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सर्व विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पाठाचे करण्याचे आयोजन केले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘आप’चे सर्व नेते या धार्मिक कार्यक्रमात सामील होणार आहेत. ‘आप’च्या निर्णयावर आता ओवेसी यांनी टीका केली आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटावरही शरसंधान साधले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवेसी म्हणाले, “तुमच्यात (‘आप’ आणि इतर पक्ष) भाजपा-आरएसएसमध्ये काय फरक आहे. या पक्षातील कुणी नेते म्हणतात, शरयू नदीवर जाणार, कुणी राष्ट्रपतींना नाशिकमधील काळाराम मंदिरात बोलवत आहे, इथे दिल्लीत ‘आप’तर्फे सूरजकांड आणि हनुमान चालीसाचे पठन केले जाणार आहे. त्यामुळे यांच्यात आणि भाजपाच्या विचारधारेत कोणताही फरक दिसत नाही. मग तुम्ही मोदींना कसे हरविणार? मला वाटतं विरोधकांचा हा दुटप्पीपणा आहे.”
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने २२ जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजेचे आयोजन केले आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निमंत्रण दिले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला आणि संसदेच्या नव्या इमारतीचे उदघाटन करताना राष्ट्रपतींना बोलावले गेले नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाने काळाराम मंदिरात पूजा करण्याचे निमंत्रण राष्ट्रपतींना पाठविले. मात्र यावर ओवेसींनी टीका केली. “आता हिंदुत्वाचे स्पर्धात्मक राजकारण होताना दिसत आहे. बहुसंख्या मतदारांचे अधिकाधिक मतं कशी मिळवता येतील, याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आताही वेळ आहे. देशात धर्मनिरपेक्ष विचार माननाऱ्या लोकांनी यावर विचार करायला हवा”, असेही ओवेसी पुढे म्हणाले.
तसेच ओवेसी यांनी स्वतःच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत ‘आप’ पक्षाला RSS चा छोटा रिचार्ज असल्याचे म्हटले. ‘आप’ने २२ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पाठ पठण करण्याचे आयोजन केले आहे. मी हे आठवण करून देऊ इच्छितो की, हे पक्ष ब्लिकिस बानो प्रकरणावर मौन बाळगून होते. ते म्हणाले की, ते फक्त शिक्षण आणि आरोग्याच्या विषयासंदर्भात बोलतील. मग सुंदरकांड पाठ हा काही शैक्षणिक विषय आहे का? सत्य तर हे आहे की, या लोकांना न्यायाशी काहीही देणेघेणे नाही. संघाच्या भूमिकेला खतपाणी घालण्याचेच काम हे पक्ष करत असतात.
ओवेसींनी ‘आप’वर टीका केल्यानंतर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सुंदरकांड सारख्या कार्यक्रमावर कुणाचाही आक्षेप नसला पाहीजे. अशा चांगल्या कार्यक्रमावर जर कुणाला आक्षेप असेल तर ही वाईट गोष्ट आहे. भगवान हनुमान ओवेसींना आशीर्वाद देवो.