दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न नसलेल्या कदाचित एकमेव नेत्या असल्या तरी त्यांनी संघाची भरभरून स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संघ ही प्रखर राष्ट्रवादी संघटना असून तिने देशाला एकसंध ठेवले आहे, असे बेदी यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. संघ अत्यंत शिस्तप्रिय संघटना असून तिचे देशाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान आहे, असे बेदी यांनी म्हटले आहे. संघ प्रखर राष्ट्रवादी संघटना असून तिने भारताला एकसंध ठेवले आहे, असे त्या म्हणाल्या.
आपचे नेते अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजपथावर आंदोलन केले. त्यानंतर दिल्लीत बरीच उलथापालथ झाली. त्यामुळे दिल्लीला संघर्षांच्या राजकारणापासून वाचविण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या. केजरीवाल यांनी धरणे धरल्याने तीन दिवस दिल्ली ठप्प झाली होती. आपण अराजकवादी असल्याचे म्हणणारे केजरीवाल कोणत्या वृत्तीचे माणूस आहेत, असा सवालही बेदी यांनी केला.
भाजपमध्ये असंतोष नाही
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने पक्षात तीव्र असंतोष खदखदत असल्याच्या वृत्ताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी खंडन केले आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. किरण बेदी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करण्यात आल्याने दिल्ली भाजपचे काही नेते नाराज झाले असल्याचे म्हटले जाते. त्याबाबत बोलताना त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. कोणाची नाराजी असल्यास त्यांनी पक्ष नेत्यांशी चर्चा करावी, असे  राजनाथ सिंह म्हणाले.
लाला लजपतराय, भाजप स्कार्फ व किरण बेदी
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्या पुतळ्याभोवती भाजपचा स्कार्फ लपेटून नव्या वादाला तोंड फोडले. मात्र काही मिनिटांनी त्यांनी तो स्कार्फ काढून घेतला. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कृष्ण नगर येथे जाऊन बेदी यांनी लाल लजपतराय यांचा पुतळा स्वच्छ केला आणि त्याभोवती भाजपचे चिन्ह असलेला भगव्या रंगाचा स्कार्फ लपेटला. त्याबद्दल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बेदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर बेदी यांनी हा स्कार्फ काढून घेतला. कृष्णनगरमध्ये रोड-शो करण्यापूर्वी बेदी यांनी चहा विक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. किरण बेदी यांनी स्वातंत्र्यसेनानींचे ‘भगवेकरण’ करू नये. स्वातंत्र्यसेनानी हे कोणत्याही पक्षाचे नसतात, तर ते देशाचे असतात. किमान त्यांना तरी अशा प्रकारातून वगळावे. भाजप, काँग्रेस अथवा अन्य कशातही स्वातंत्र्यसेनानींची विभागणी केली जाऊ नये, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा