केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टीमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर  कोझीकोड येथे पुन्हा एकदा हल्ला झाला आहे हा हल्ला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. हल्ल्यात चार स्वयंसेवक आणि एक भाजप कार्यकर्ता जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये तणावाची स्थिती आहे. संघाच्या कार्यलयावर बॉम्बहल्ला करण्यात आला होता. यामध्ये तीन स्वयंसेवक जखमी झाले होते.

यानंतर सीपीआयएमच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता.  हा हल्ला कुणी घडवून आणला त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उज्जैनचे सहप्रचारप्रमुख कुंदन चंद्रावत यांनी एक वादग्रस्त वक्यव्य केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुंदन चंद्रावत यांच्या केरळच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्चा विधानाचा निषेध केला आणि त्यांची सर्व पदांवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

चंद्रावत हे नेहमीच वादग्रस्त नेते राहिले आहेत. सहप्रचारप्रमुख पदावर काम करणाऱ्या चंद्रावत यांनी याआधीही अनेक विचित्र विधानं केली आहेत. तसेच अनेक विचित्र दावेही केले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन् यांचा खून करून त्यांचं शिर आणून देणाऱ्या माणसाला आपण आपली १ कोटीहून जास्त किंमत असणारी मालमत्ता देऊन टाकू असं कुंदन चंद्रावत यांनी जाहीर केलं होतं. चंद्रावत यांनी गोध्र्याच्या घटनेनंतर आपण २००० मुस्लिमांना ठार केलं असल्याचा दावा केला होता. कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गेल्या काही वर्षांपासून तणाव वाढला आहे. त्यांची सर्व पदांवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. संघाच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला झाला म्हणून काही अज्ञात व्यक्तींनी गुरूवारी  माकपच्या कार्यालयाला आग लावली होती. विष्णूमंगलम येथे स्थित असलेल्या या कार्यालयावर गुरुवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला आणि त्याला आग लावली.