राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक ज्या गावामध्ये जातात, तेथील सुंदर मुलींना पळवून नेतात, असा खळबळजनक आरोप मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कांतिलाल भुरिया यांनी केलाय. जेवण्याच्यानिमित्ताने संघाचे लोक घरामध्ये प्रवेश करतात, मात्र, त्यांची नजर घरातील सुंदर मुलींवर असते, असेही भुरिया यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ख्याती असलेल्या भुरिया यांच्या या नव्या वक्तव्यामुळे मोठा वाद उदभवण्याची चिन्हे आहेत. भोपाळमध्ये आदिवासी भागातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भुरिया यांनी मंगळवारी हा आरोप केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर बलात्कार आणि त्यांचा विनयभंग केल्याची काही वादग्रस्त उदाहरणेही भुरिया यांनी यावेळी दिली.
संघाच्या लोकांना तुमच्या गावांमध्ये घुसू देऊ नका, जर त्यांनी अगोदरच घुसखोरी केली असेल, तर त्यांना पिटाळून लावा, असे आवाहन भुरिया यांनी आदिवासी भागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. संघाच्या लोकांविरुद्ध पोलिस गुन्हा नोंदवित नसल्यामुळे ते शेफारले आहेत. मध्य प्रदेशमधील भाजपचे सरकार त्यांच्याबाबत खूपच नरमाईची भूमिका घेते, असा आरोप भुरिया यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss men rape take away tribal girls kantilal bhuria