धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यावंर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
नागपुरातील एका वृत्तपत्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या व्याख्यानाला संबोधित करत असताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी धर्मसंसदेत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर करत सांगितलं की, “धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही”.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात हरिद्वार येथे पार पडलेल्या धर्मसंसेदत मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह विधानं कऱण्यात आली. तर दुसरीकडे रायपूर येथे पार पडलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींसंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मोहन भागवत यांनी संघ आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत असं म्हटलं आहे.
लोकसत्ता विश्लेषण: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली ‘धर्म संसद’ म्हणजे काय?, तिथे घडलं तरी काय?
“वीर सावरकरांनी हिंदू समाजाची एकता आणि संगठित करणं याबद्दल सांगितलं होतं, परंतु त्यांनी हे भगवद्गीतेचा संदर्भ घेऊन सांगितलं होतं. कोणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही,” असंही सरसंघचालक म्हणाले. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावर?
भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “हे हिंदू राष्ट्र बनवण्यासंबंधी नाही. कोणी स्वीकार करो अथवा नाही, पण हे तेच (हिंदू राष्ट्र)आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे”.
“संघाचा विश्वास लोकांमध्ये फूट पाडणं नसून त्यांच्यातील मतभेद दूर करणं आहे. यातून निर्माण होणारी एकता मजबूत असेल. हिंदुत्वाच्या माध्यमातून आम्हाला हे कार्य करायचं आहे,” असं सरसंघचालकांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “वीर सावरकरांनीही हिंदू समाज एकजूट आणि संगठित झाल्यास तो कोणाचा विनाश किंवा नुकसान कऱण्यासंबंधी न बोलताना भगवद्गीतासंबंधी बोलेल असं म्हटलं होतं”.