राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ( आरएसएस ) मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २ ऑक्टोबरला संचलनाची आणि त्यानंतर सार्वजनिक सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत आरएसएसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आरएसएसने आपल्या याचिकेत म्हटलं की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहे. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर संघटनेने त्यांचा गणवेश परिधान करून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या परवानगीसाठी कोरत्तूर पोलीस ठाण्यात अर्जही देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही त्या अर्जावर निर्णय घेण्यात आला नाही.
याचिकाकर्त्याने पुढं सांगितलं की, पोलीस अन्य सर्व राजकीय पक्षांना परवानगी देतात. पण, केवळ आरएसएसला अशा प्रकारे डावलण्यात येते. अधिकारी संविधानाच्या विरोधात काम करतात, असा आरोपही लावण्यात आला. याप्रकरणी आतापर्यंत सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आणखी पन्नास याचिका दाखल होतील. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी २२ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.