उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या योगी सरकारविरोधात वाहत असलेले वारे पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) उघडपणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा यात्रा काढून भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याची तयारी आरएसएसने सुरू केली आहे.

आरएसएस उत्तर प्रदेशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखत आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटीशांशी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीपासून १६ डिसेंबर ज्या दिवशी भारताने १९७१च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला होता तोपर्यंत सुरु राहणार आहे.

यावेळी आरएसएसने ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची संघर्षगाथा विविध संघटना आणि समाजाच्या मदतीने समाजासमोर आणणार आहे. यासाठी वंदे मातरम गायन, तिरंगा यात्रा, परिसंवाद, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बलिदान दिलेल्या वीरांची माहिती लोकांना दिली जाणार आहे.

त्यासाठी शहर, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत अमृत महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. आरएसएसचे संजय सिंह म्हणाले की, “शतकानुशतकांच्या अखंड संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा हा प्रसंग आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याकडे पाहण्याची संधी देतो. त्या वेळी स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेशीचा भाव काय होता, यातून आठवण्याची संधी मिळणार आहे.”

या अमृत ​​महोत्सवांतर्गत गावोगावी भारत मातेचे पूजन, वंदे मातरमचे गायन, तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. शिख धर्माचे नववे गुरू गुरू तेग बहादूर सिंग यांच्या ४००व्या जयंतीनिमित्त आरएसएस मोठे कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित करणार आहे.

“कार्यकारी मंडळाच्या बैठकीत बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. बांगलादेशातील हिंदू समाजावर झालेला हल्ला ही काही अचानक घडलेली घटना नाही. फेक न्यूजच्या आधारे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदू समाजाला संपवण्याचा हा नियोजित प्रयत्न होता,” असे आरएसएसचे संजय सिंह म्हणाले.

Story img Loader