देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ते घडवित आहे. पुढील शतक भारताचे असून जगभरात देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी संघाच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्था प्रेरणादायी ठरतील. देशाची प्रगती व विकास साधण्यासाठी प्रबोधिनी वाटा उचलत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी मंगळवारी येथे काढले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अडवानी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित होते. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर म्हाळगी प्रबोधिनीचा मोठा वाटा आहे. ही संस्था कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी यांना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. देशाच्या विकासात एक आदर्श निर्माण करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यासाठी कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे प्रशिक्षण आवश्यक असून त्यामध्ये म्हाळगी प्रबोधिनीचे योगदान मोठे आहे, असे अडवानी यांनी सांगितले. आपल्या संघ जीवनातील आणि प्रबोधिनीच्या काही आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
यावेळी भैय्याजी जोशी म्हणाले की, सामाजिक जीवनात वावरताना एखाद्या विचार प्रणालीशी समर्पित असणे महत्त्वाचे असते. कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता आपले काम करीत राहिले पाहिजे आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करायला हवा. कार्यकर्त्यांने निरपेक्षपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे. असे कार्यकर्ते घडविण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मोलाचे योगदान देत आहे. नितीन गडकरी यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या जलनीती व अन्य अभ्यास वर्गाचा आणि संशोधन कार्याचा आढावा घेऊन त्याचा उपयोग मध्य प्रदेश व अन्य राज्यांना विकासासाठी झाला याची उदाहरणे सांगितली. देशाच्या आमूलाग्र परिवर्तनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असून प्रबोधिनीने व्याप्ती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रेखा महाजन आदी उपस्थित होते. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविकात प्रबोधिनीच्या वाटचालीचा आढावा घेतला.
‘संघा’मध्ये कार्यकर्ते घडतात- अडवाणी
देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ते घडवित आहे. पुढील शतक भारताचे असून जगभरात देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी संघाच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्था प्रेरणादायी ठरतील. देशाची प्रगती व विकास साधण्यासाठी प्रबोधिनी वाटा उचलत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी मंगळवारी येथे काढले.
First published on: 23-01-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss produce the good party worker