थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपलं आयुष्य देशासाठी वेचलं. नेताजी खूप शिकलेले होते. मात्र त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल हे देशाच्या विकासाच्या आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने पडलं होतं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. कोलकाता या ठिकाणच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर भारत हा महान देश व्हावा हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं जे आजही अधुरं राहिलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
देशभरात साजरी केली जाते आहे नेताजींची जयंती
आज संपूर्ण देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते आहे. आजचा दिवस हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. याच दिवसाचं औचित्य साधत पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही एका भव्य कार्यक्रमाचं कोलकाता या ठिकाणी आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमात मोहन भागवत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे आपले विचार विशद केले.
काय म्हटलं आहे मोहन भागवत यांनी?
आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. आपला देश हा जगातला महान देश झाला पाहिजे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलेलं स्वप्न आजही अधुरं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर जात आपण जगभरात शांतता आणि बंधुभाव प्रस्थापित करू शकतो.
नेताजींच्या त्याग आणि बलिदानाला सलाम करणं हे आपलं कर्तव्य
आज आपल्या देशातलं आपलं जीवन हे ज्यांच्या त्यागावर आणि बलिदानावर आहे त्यांच्या कृतज्ञतेला सलाम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना मिळून देशाला एक स्थान मिळवून द्यायचं आहे. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य असं होतं की त्यांच्यात लहानपणापासूनच गुणवत्ता होती. तसंच ते खूप संवेदनशील होते. देशासाठी त्यांनी सगळं आयुष्य वेचलं. अनेकांकडे गुणवत्ता असते, संवेदनशीलता असते पण ते गुण फक्य आपल्या ठायी असून काही होत नाही. आपल्या स्वार्थाचा नेताजींनी कधीही विचार केला नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठरवलं असतं तर ते खूप पैसे कमवू शकले असते. मात्र त्यांनी देशासाठी आपलं सगळं आयुष्य ज्या प्रमाणे वनवासात कष्ट भोगावे लागतात तसेच कष्ट वेचले. देशासाठी त्यांनी एक तपश्चर्या केली आणि ती देखील हसत हस केली. निस्पृहता आणि निस्वार्थ बुद्धि यांचं आदर्श कुणाकडून घ्यायचं असेल तर ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. देशासाठी कुठलंही साहस करणं त्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा न करणं हा गुणही नेताजींच्याच ठायी होत्या.
स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताला अशा तरूणांची आवश्यकता आहे जे गुरू गोविंद सिंग यांच्यासारखे असतील. गुरू गोविंद सिंग यांनी आपलं सगळं आयुष्य लढण्यात घालवलं. त्या बदल्यात त्यांना उपेक्षा सहन करावी लागली. मात्र त्यांनी तोंडून कधीही ब्र काढला नाही. जर स्वामींचं हे वर्णन लक्षात घेतलं तर त्या वर्णनाचं पालन सुभाषबाबूंनी कायमच केलं असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.