RSS Workers : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळच्या थलासरी न्यायालयाने हा निर्णय मंगळवारी दिला. २००५ मध्ये सीपीआय (M) चा कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या करण्यात आली होती. ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी ही घटना घडली होती. या प्रकरणात न्यायालयाने नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे हे प्रकरण?

रिजिथ शंकरन याची हत्या २००५ मध्ये करण्यात आली होती. रिजिथ हा डाव्या विचारांचा कार्यकर्ता होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांच्यात वादावादी सुरु होती. ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी रिजिथ हा त्याच्या घरी चालत चालला होता. त्याच्याबरोबर त्याचे मित्रही होते. त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा एक जमाव त्या ठिकाणी आला. त्यांच्याकडे शस्त्रं होती. त्यांनी रिजिथ आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. रिजिथला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या. तर त्याचे इतर मित्र जखमी झाले. या प्रकरणात आता थलासरी न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुधाकरन (वय-५७), जयेश (वय-४१), रणजीत (वय-४४), अजींदरन (वय-५१), अनिलकुमार (वय-५२), राजेश (वय ४६), श्रीजीत (वय ४३) आणि भास्करन (वय-६७) या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पोलिसांनी त्यावेळी हत्यारं आणि रक्ताने माखलेले कपडे केले होते जप्त

संघाच्या या स्वयंसेवकांकडे दोन तलवारी, एक मोठा खंजीर आणि एक स्टिलचा रॉड होता. पोलिसांनी ही हत्यारं जप्त केली. तसंच पोलिसांना आरोपींचे रक्ताने माखलेले कपडेही मिळाले. या प्रकरणात १४ मार्च २००६ ला आरोपपत्र दाखल झालं होतं. आत्तापर्यंत २८ साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात नोंदवण्यात आल्या. तसंच ५९ पुरावे आणि दस्तावेज यांची ओळख पटवण्यात आली.

कुठल्या कलमांच्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला?

आयपीसीच्या कलम ३०३, कलम ३०७, कलम १४३ या अंतर्गत या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच कलम ३४१ आणि कलम ३२४ या कलमांच्या अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सगळ्यांना ४ जानेवारी या दिवशी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानेही दोषी ठरवलं होतं. एकूण १० स्वयंसेवक या गुन्ह्यात सहभागी होते. मात्र यातल्या एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या नऊ जणांना हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss workers sentenced to life for 2005 murder of cpi m worker in kerala scj