चीन आणि इतर देशांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. करोनाच्या BF.7 या व्हेरियंटचा धोका वाढू नये यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारकर करण्यात आली आहे.

या सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता प्रवास सुरु करण्याआधी एअर सुविधा पोर्टलवर टेस्टचा रिपोर्ट अपलोड करावा लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता १ जानेवारीपासून आरटी-पीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर हा खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे.

जानेवारी महिन्यात भारतात करोनाचा फैलाव जलदगतीने होऊ शकतो, अशी शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर मोघमपणे काही प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत होती. बुधवारी झालेल्या सहा हजार करोना चाचण्यांपैकी ३९ लोक करोना पॉझिटिव्ह आढळले होते.

मागच्या २४ तासांत करोनाचे २६८ रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (गुरुवारी) करोना रुग्णांची ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मागच्या २४ तासांत करोना संक्रमण झालेले २६८ नवे रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांना मिळून देशभरात आता एकूण ३ हजार ५५२ रुग्ण झाले आहेत. सध्यातरी देशात करोना संक्रमणाचा दर ०.११ टक्के असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Story img Loader