करोनाच्या BF 7 या नव्या व्हेरिएंटने चीनमध्ये कहर माजवला आहे. चीन आणि जपान या दोन्ही देशांमध्ये करोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानेही चौथ्या लाटेला तोंड देण्यासाठी कंबर कसली आहे. भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे रोज आढावा बैठक घेत आहेत त्याचप्रमाणे आरोग्य तज्ज्ञांशी चर्चाही करत आहेत. अशात मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीन, जपानसह काही महत्त्वाच्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी बंधनकारक असणा आहे असं मनसुख मांडवीय यांनी ANI या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केलं आहे.
काय म्हटलं आहे मनसुख मांडवीय यांनी?
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलँड या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी सक्तीची असणार आहे. ज्या प्रवाशाला लक्षणं आढळतील किंवा ज्या प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येईल. AIR Suvidha हा फॉर्मही चीन, जपान, साऊथ कोरिया, हाँगकाँग आणि थायलँडवरून येणाऱ्या प्रवाशांना भरणं सक्तीचं असणार आहे. यामध्ये त्यांना आपल्या प्रकृतीची सद्यस्थिती नमूद करावी लागणार आहे.
चीन, जपान या देशांमध्ये करोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आहे. मनसुख मांडवीय यांनी सलग तीन दिवस बैठका घेऊन राज्यांमधल्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत.
मनसुख मांडवीय यांनी राज्यांना काय सूचना दिल्या आहेत?
नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तो लक्षात घेऊन टेस्ट- ट्रॅक-ट्रीट आणि व्हॅक्सिनेशन यावर भर द्या अशी महत्त्वाची सूचना दिली आहे.
याशिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मास्क लावणं, हात स्वच्छ ठेवणं आणि सोशल डिस्टन्सिंग कसं राहिल हे पाहणं म्हणजेच कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याचं नागरिकांना आवाहन करावं अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने फ्ल्यू किंवा इतर गंभीर आजारांच्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष ठेवण्याच्या सूचनाही राज्यांना दिल्या आहेत. सगळ्या राज्यांनी कोव्हिड १९ संदर्भातली तयारी करून ठेवा आणि आरोग्य विषयक तयारी सुसज्ज ठेवा अशाही सूचना दिल्या आहेत. आपण आजवर करोनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. जर करोनाची चौथी लाट आली तर त्या लाटेला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलावीत असंही केंद्र सरकारने सुचवलं आहे.
रूग्णालयांना ड्राय रन करण्याच्या सूचना
राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोव्हिड नियमांच्या अंतर्गत आरटी पीसीआर आणि अँटीजन टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. करोनाचा BF 7 हा व्हेरिएंट जास्त प्रमाणात संक्रमण वाढवतो आहे. त्यानुसार जर या व्हेरिएंटची लागण झालेला रूग्ण आढळला तर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जास्तीत जास्त केसेसमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग केलं जावं असे निर्देशही दिले आहेत.
रूग्णालयांनी समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार रहावं. आपल्या रूग्णालयात रूग्ण आले तर काय करायचं याचा ड्राय रन म्हणजेच सरावही करावा असंही केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांमध्ये सुचवण्यात आलं आहे.
राज्यांनी लसीकरण वाढावं यासाठी पुढाकार घ्यावा. तसंच ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनी बूस्टर डोस घ्यावा यासाठी जनजागृती मोहीम राज्यांनी सुरू करावी अशीही एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
नव्या वर्षाच्या स्वागताच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने इव्हेंट ऑर्गनायझर्स, व्यापारी संघटना, बिझनेस ऑनर्स यांनाही सुचित करावं की एका ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही.