Ruchir Sharma on US Reciprocal Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी जगभरातल्या देशांवर समन्यायी व्यापार कर अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले आणि जगभरात खळबळ उडाली. काही देशांवर सरसकट १० टक्के तर काही देशांवर अव्वाच्या सव्वा कर आकारण्यात आले आहेत. त्यात चीनवर तर सध्या २४५ टक्के इतका अवाढव्य कर लागू करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या धोरणात चीनसह काही देश वगळता इतर देशांवरील कराबाबत ९० दिवसांचा ‘पॉज’ घेतला असला, तरी याचे अर्थकारणावर परिणाम होताना दिसत आहेत. यावरच सुप्रसिद्ध लेखक व ग्लोबल इन्व्हेस्टर रुचिर शर्मा यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

रुचिर शर्मा यांनी इंडिया टुडेला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थांवरील परिणाम व पर्यायाने भारतासाठी यात संधी की तोटा? या अनुषंगाने विश्लेषण केलं आहे. त्यांच्यामते ट्रम्प यांच्या या धोरणाचा प्रथमदर्शनी भारताला तोटा होणार असल्याचं चित्र निर्माण झालं असलं, तरी शेवटी त्याचा भारताला फायदाच होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ आणि भारत

रुचिर शर्मा यांच्यामते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे खुद्द अमेरिकन अर्थव्यवस्थेत नकारात्मक वातावरण दिसत असलं, तरी भारताला या धोरणाचा अप्रत्यक्षपणे फायदाच होणार आहे. “सध्या भारतात येणारी परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आटली आहे. पण हे चित्र आता बदलू शकतं. आर्थिक बाबतीत सध्या जागतिक पातळीवर पुन्हा समतोल साधण्याची प्रक्रिया चालू आहे, ज्यात अमेरिकेत सकारात्मक वातावरण नसतानाही भारतासारख्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक वाढताना दिसत आहे”, अशी भूमिका रुचिर शर्मा यांनी मांडली आहे.

कमकुवत डॉलर आणि इतरांना फायदा

रुचिर शर्मा सांगतात की जेव्हा अमेरिकेचा डॉलर कमकुवत होतो, तेव्हा जगभरातल्या इतर बाजारपेठांना त्याचा फायदा होताना दिसतो. “अमेरिकेतून गुंतवणूक बाहेर पडताना दिसत आहे. पण याचा भारताला फायदा होतोय. फक्त शेअर मार्केटमध्येच नाही, परकीय गुंतवणूक वाढण्यामध्येही. कदाचित हे सगळं भारतासाठी जितकं वाईट मानलं जात होतं, तेवढं वाईट नसेल”, असा अंदाज रुचिर शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

“महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय बाजारपेठेत सध्या अमेरिकेतील घडामोडींच्या विरुद्ध कल पाहायला मिळत आहे. याआधी वॉल स्ट्रीट शेअर बाजारामध्ये दिसणाऱ्या कलांच्या अनुषंगानेच भारतीय बाजारपेठेचं वर्तन पाहायला मिळत होतं”, असंही रुचिर शर्मांनी नमूद केलं.

रुचिर शर्मांनी केलं सतर्क!

दरम्यान, रुचिर शर्मांनी भारतीय बाजारपेठेतील सकारात्मक बदलांबाबत भाष्य केलं असलं, तरी एका बाबतीत मात्र त्यांनी सतर्क केलं आहे. “आपण सगळ्याच बाबींचा विचार भारत-अमेरिका किंवा चीन-अमेरिका यासंदर्भात करता कामा नये. जगभरातल्या १० वेगाने विकसित होत असलेल्या व्यापार संघांपैकी आठमध्ये अमेरिका नाही, फक्त पाचमध्ये चीन आहे आणि भारत तर त्यातल्या फक्त एका संघात आहे”, असं ते म्हणाले.

“भारतानं चीनबाबत आपल्या धोरणाचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. अर्थात, हे लांगुलचालन नाही, पण आशियाई बाजारपेठेत भारत चीनसमोर स्वत:ला कसं भक्कमपणे स्थापित करतो हे महत्त्वाचं ठरेल. चीनशी ताणले गेलेले संबंध काही प्रमाणात का होईना, सामान्य पातळीवर येणं आवश्यक आहे”, असं म्हणत चीनही सध्या अमेरिकेच्या दबावाखाली असून या बाबतीत सौम्य भूमिका घेण्याच्या शक्यतेचेही सूतोवाच त्यांनी यावेळी केले.