ऑस्ट्रेलियाच्या मावळत्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांना नाटय़मयरीत्या पदच्युत केल्यानंतर विद्यमान पंतप्रधान केवीन रुड यांनी सोमवारी आपल्या मंत्रिमंडळात सहा महिला मंत्र्यांचा समावेश केला. हा एक उच्चांक मानला जात आहे. कॅनबेरा येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक होण्यापूर्वी गव्हर्नर जनरल क्वेण्टिन ब्राइस यांनी या मंत्र्यांना पदभार आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सर्व महिला मंत्री कॅबिनेट दर्जाच्या आहेत. मंत्रिमंडळातील ३० मंत्र्यांपैकी ११ मंत्री महिला आहेत.
गेल्या आठवडय़ात सत्तांतर होऊन रुड यांनी ५७ मते मिळवून गिलार्ड यांचा पराभव केला. तीन वर्षांपूर्वी, पहिल्या महिला पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेने गिलार्ड यांनी याच पद्धतीने रुड यांचा पराभव केला होता. आता रुड यांनी गिलार्ड यांचा पराभव करून मागचे उट्टे काढले. मंत्रिमंडळातील सहकारी निखळ गुणवत्तेवर निवडण्यात आले आहेत, असे रुड यांनी सांगितले.

Story img Loader