महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते राजीव प्रताप रुडी मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. राज ठाकरे यांनी मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतरही शिवसेना आणि भाजपतील युती कायम राहील आणि भाजपसाठी शिवसेना हा महत्त्वाचा मित्रपक्ष असेल, अशी ग्वाही या भेटीमध्ये रुडी उद्धव ठाकरे यांना देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या भेटीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवील यांनी उद्धव ठाकरे ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजपसाठी शिवसेना हा विश्वासू साथीदार पक्ष असल्याची ग्वाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते फक्त महायुतीतील उमेदवारांचाच प्रचार करतील, असेही आश्वासन त्यांनी दिले. स्वतः फडणवीस यांनीच याबाबत सोशल नेटवर्किंग साईट टि्वटर माहिती दिली.
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मुंबईतील एका हॉटेलात भेट घेतली होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून नितीन गडकरींवर तीव्र टीका करण्यात आली होती. यानंतरही भाजपचे मुंबईतील प्रमुख आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेणे सुरूच ठेवले. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण कमी व्हावे, यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी राजीवप्रताप रुडी यांची नियुक्ती केली आहे. रुडी मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Story img Loader