बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु कोणत्याही वक्तव्यामुळे नव्हे तर त्यांचं प्रवचन ऐकून एका तरुणीने धर्मांतर केल्यामुळे चर्चेत आले आहेत. धीरेंद्र शास्त्रींचं प्रवचन ऐकून मुजफ्फरपूरमधील २२ वर्षीय रुखसाना ही तरुणी आता रुक्मिणी झाली आहे. दोघांनी आधी हाजीपूर येथे गंडक नदीत डुबकी घेतली, मग हिंदू पद्धतींनुसार एका मंदिरात सात फेरे घेतले. तिचा पती वैशाली येथील रहिवासी आहे.
मुझफ्फरपूरमधील गिजान्समधली रहिवासी नौशीन परवीन उर्फ रुखसाना आणि वैशाली येथील रहिवासी रोशन कुंवर (२५) हे दोघे २०१८ मध्ये जयपूर येथील एसआरपीएस कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले होते. तिथेच दोघांची मैत्री झाली. मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चार वर्ष एकमेकांना डेट करून आता या दोघांनी लग्न केलं आहे.
दोघांनी आधी आपापल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. रोशनच्या आई-वडिलांनी लग्नाला होकार दिला. परंतु रुखसानाच्या घरच्यांनी या लग्नाला तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर तरुणी रोशनला म्हणाली, मी सनानत धर्म स्वीकारेन मग लग्न करेन. त्यानंतर रुखसानाने सनातन धर्माचा स्वीकार केला, रुखसाना रुक्मिणी झाली. त्यानंतर रविवारी वैशाली येथील लालगंजमधल्या रेपुरामधील अर्धनारीश्वर महादेव मंदिरात दोघांनी सात फेरे घेतले.
काय म्हणाली रुक्मिणी?
या लग्नाबद्दल तरुणीने दैनिक भास्करला सांगितलं की, जयपूरमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. मी मुस्लीम आहे. परंतु मी रोशनला सांगितलेलं सनातन धर्माचा स्वीकार करेन मग लग्न करेन. मला बागेश्वर बाबांकडून हिंदू धर्म स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचं प्रवचन ऐकूनच मी हा निर्णय घेतला. मी स्वतः रोशनला लग्नासाठी विचारलं होतं.
हे ही वाचा >> “पुणे लोकसभा काँग्रेसलाच मिळायला हवी, कारण…”, नाना पटोलेंनी दंड थोपटले, अजितदादांच्या दाव्यावर उत्तर देत म्हणाले…
रोशन म्हणाला, आम्ही या लग्नामुळे खूप आनंदी आहोत. रुख्सानाने तिच्या मर्जीने सनातन धर्म स्वीकारला आहे आणि मग माझ्याशी लग्न केलं आहे.