Gujarat Crime News : लग्न करण्याकरता पळून गेलेल्या जोडप्याची हत्या करण्यात आली आहे. त्यांना आश्रय दिलेल्या व्यक्तीनेच या दोघांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे तरुणीची हत्या करण्याआधी नराधमाने तिच्यावर बलात्कारही केला. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

खेडा जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) राजेश घडिया यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, जोडप्याच्या कुटुंबियांकडून त्यांच्या नात्याला संमती नव्हती. त्यामुळे मुलीचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरवण्यात आलं. या लग्नाच्या आदल्या दिवशीच हे जोडपं घरातून पळून गेलं. बुधवारी हे जोडपं खेडा येथे आले आणि डाकोरमधील एका तलावाकाठी बसले होते. तिथे त्यांना २४ वर्षीय तरुण भेटला. त्याने या जोडप्याला बोलण्यात गुंतवलं आणि विश्वास संपादन केला. या तरुणाने जोडप्याला एका गावातील शेतात राहण्यास जागा दिली. संध्याकाळी शेतमजूर निघून जाण्यासाठी काही तास वाट पाहिल्यानंतर हे जोडपं शेतातील एका घरात गेलं. तिथे हे दोघेही झोपी जाण्याची वाट आरोपीने पाहिली. ते झोपी जाताच आरोपीने तरुणावर आधी हल्ला केला.

त्याने प्रथम लाकडी काठीने तरुणाच्या डोक्याला दुखापत केली. नंतर तरुणीला जखमी केले. त्यामुळे ती प्रतिकार करू शकली नाही. त्यानंतर तरुणीवर त्याने बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने तिचीही हत्या केली. वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचारानंतर तरुणीच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीकडून सीसीटीव्ही लपवण्याचा प्रयत्न

“आम्ही आरोपीची चौकशी सुरू केली आह. हत्येसाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला गेलाय, याचाही शोध सुरू आहे. आतापर्यंत, त्याने लाकडी काठ्यांचा वापर केल्याचे म्हटले आहे. गुन्ह्यानंतर त्या माणसाच्या हालचाली जाणून घेण्याकरता त्याच्या रिमांडची मागणी करण्यात आली आहे. आम्हाला त्या जोडप्यासोबत असलेल्या माणसाचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहे, जिथे तो सीसीटीव्ही लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. जर त्याला मदत करण्याची ऑफर देताना गुन्हा करण्याचा हेतू नसेल तर असे करण्याची गरज नव्हती”, असे एसपी म्हणाले.

शेताच्या मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

घडिया म्हणाले की, आतापर्यंत पोलिसांना आरोपीशी संबंधित कोणताही गुन्हेगारी इतिहास आढळलेला नाही, परंतु त्याच्या विकृत स्वभावामुळे वैवाहिक कलहाबद्दल माहिती मिळाली आहे. वैद्यकीय तपासणी आणि पुरावे गोळा करण्यासाठी देखील काही दिवस लागतील. त्यानुसार, आम्ही १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. ज्या शेतात दोन्ही पीडितांची हत्या झाली त्या शेताच्या मालकाच्या तक्रारीवरून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलमांतर्गत निनामाविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.