Udaya Kumar Reacts on Row Over TN Govt Rupee symbol : तमिळनाडू सरकार व केंद्र सरकारमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून वाद चालू असतानाच गुरुवारी (१३ मार्च) तमिळनाडूच्या विधानसभेत राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात रुपयाच्या ₹ या चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील रुबईचं (तमिळमध्ये रुपये) नवं चिन्ह (ரூ) वापरलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाषेवरून चालू असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तमिळनाडू सरकारने तमिळ भाषेतील ரூ (रु) हे अक्षर रुपयाचं चिन्ह म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे.
द्रमुक सरकारने केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या रुपयाच्या चिन्हाला एक प्रकारे आव्हान दिलं असलं तरी एका गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, ते म्हणजे रुपयाचं ₹ हे चिन्ह एका तमिळ माणसानेच बनवलं आहे. विशेष म्हणजे द्रमुक नेत्याच्या मुलानेच हे चिन्ह साकारलं आहे. ₹ हे चिन्ह साकारणारे उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील द्रमुकचे नेते व आमदार होते.
उदयकुमार यांनी स्टॅलिन सरकारच्या निर्णयावर भाष्य करणं टाळलं
तमिळनाडू सरकारने रुपयाच्या चिन्हाबाबत घेतलेल्या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, ₹ हे चिन्ह साकारणाऱ्या उदयकुमार यांनी स्टॅलिन सरकारच्या निर्णयावर भाष्य करणं टाळलं. उदयकुमार धर्मलिंगम हे भारतातील प्रसिद्ध डिझाइनर आहेत. त्यांनीच रुपयाचं ₹ हे चिन्ह डिझाइन केलं होतं. उदयकुमार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७८ रोजी तमिळनाडूमधील कल्लाकुरिची येथे झाला होता. ते सध्या आयआयटी गुवाहाटीमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम करत आहेत. ते सध्या गुवाहाटीत वास्तव्यास आहेत.
…तो केवळ योगायोग : डी. उदयकुमार
पीटीआयने उदयकुमार यांच्याशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “या घटनेवर माझी काहीच प्रतिक्रिया नाहीये. तमिळनाडू सरकारला वाटलं असेल की रुपयाच्या चिन्हात बदल करण्याची आवश्यकता आहे किंवा त्यांना आपल्या भाषेतील अक्षराचा वापर करून नवं चिन्ह बनवावं असं वाटलं असेल तर ते तसं करू शकतात. हा निर्णय राज्य सरकारचा आहे. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तसेच एका तमिळ व्यक्तीने, द्रमुक पक्षाशी संबंधित व्यक्तीने ते चिन्ह बनवलं होतं हा केवळ योगायोग होता.”
मुलाने बनवलेल्या चिन्हाबद्दल एन. धर्मलिंगम काय म्हणाले होते?
उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील एन. धर्मलिंगम हे द्रमुकचे आमदार होते. २०१० मध्ये रुपयाचा लोगो तयार करण्यासाठी देश पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत उदयकुमार यांच्या लोगोने बाजी मारली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेसह केंद्र सरकारने रुपयाचं ₹ हे चिन्ह भारतीय चलनाचा अधिकृत लोगो म्हणून वापरण्यास मान्यता दिली.