इंग्लंडमध्ये गेली ३०० वर्षे चलनात असलेल्या कागदी नोटा लवकरच कालबाह्य़ करण्यात येणार असून त्यांची जागा अधिक टिकाऊ, पाण्यापासून संरक्षण असलेल्या आणि बनावटगिरी करण्यास कठीण अशा प्लॅस्टिकच्या नोटा घेणार आहेत. येत्या तीन वर्षांत हा बदल झालेला पाहायला मिळणार आहे.
बँक ऑफ इंग्लंडने त्या दृष्टीने १ अब्ज पाउंड्सच्या निविदा जारी केल्या आहेत. प्लॅस्टिक नोटा तयार करणाऱ्या जगातील केवळ दोन कंपन्यांपैकी डे ला रू या कंपनीकडे २००३ पासून यासंदर्भातील कंत्राट देण्यात आले आहे. फिजीच्या पॅसिफिक या बेटासाठी या कंपनीने नुकत्याच प्लॅस्टिक नोटा तयार करून दिल्या होत्या. १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियात या नोटा पहिल्यांदाच चलनात आणल्या गेल्या. त्याव्यतिरिक्त न्यूझीलँड, रोमानिया, पापुआ न्यू गिनि, मेक्सिको आणि व्हिएतनाम या देशांत प्लॅस्टिक नोटा चलनात आहेत.