ग्रामीण उद्योजक, बचतगट व लघुउद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी रेल्वेची यंत्रणा उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी योग्य उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. अत्यंत गरीब समजल्या जाणाऱ्या भागातूनही रेल्वे जाते. शिवाय देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर दिवसभरातून एकदा वा दोनदाच रेल्वे धावते. अशा रेल्वे स्थानकांचा उपयोग बेरोजगार युवकांच्या कौशल्यविकासासाठी करता येईल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली.
बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू रेल्वेत विकण्यास सुरुवात झाल्यास मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होईल. रेल्वेला आर्थिक उत्पन्न व बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली. गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक विकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या लुपिन फाऊंडेशनच्या कार्यअहवालाचे प्रकाशन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रभू म्हणाले की, रेल्वेत बचत गट वा लघुउद्योगाच्या उत्पादनांच्या विक्रीच्या योजना आहेत. कोकण रेल्वेत कोकम विक्रीचा प्रयोगही त्याचाच एक भाग आहे. त्याला आता कौशल्यविकासाची जोड देण्यासाठी रेल्वे पुढाकार घेईल. बेरोजगार युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण दिल्यास मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. संबंधित विभागाशी (राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळ) या संदर्भात बोलणी सुरू असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले.
रेल्वे जाहिरातींसाठी अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यातून मोठय़ा प्रमाणावर रेल्वेला आर्थिक लाभ होईल. लुपिन फाऊंडेशनच्या कामाचा गौरव करताना प्रभू म्हणाले की, केवळ सरकारी यंत्रणेतून समाजपरिवर्तन होऊ शकत नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, निमसरकारी संस्थांनी योगदान देण्याची गरज असते.
‘ग्रामीण उद्योजक, बचतगटांच्या उत्पादनांची विक्री रेल्वेमध्ये शक्य’
ग्रामीण उद्योजक, बचतगट व लघुउद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी रेल्वेची यंत्रणा उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी योग्य उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-01-2015 at 12:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural entrepreneurs and products of savings group can sales in train