रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. युक्रेनला या युद्धाचा चांगलाच फटका बसत असून या देशाला जीवित तसेच वित्तहानीला तोंड द्यावे लागतेय. संयुक्त राष्ट्रांनी दिलेली माहिती तर धक्कादायक आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये प्रत्येक सेकंदाला एक मुलगा निर्वासित होतोय, असं संयुक्त राष्ट्रांनी सांगितलंय.
रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी रोजी आक्रमण केले. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल १.५ मिलीयनहून अधिक मुलांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी तशी माहिती दिलीय. “प्रत्येक मिनिटाला ५५ मुले युक्रेन देश सोडून गेली आहेत. म्हणजेच युक्रेनमध्ये जवळजवळ एका सेकंदाला एक मुलगा निर्वासित झाला आहे,” असे UNICEF चे प्रवक्ते जेम्स एल्डर यांनी सांगितले.
वेगवेगळ्या मार्गाने युक्रेनला या युद्धाची झळ बसत आहे. तर दुसरीकडे रशियाने आक्रमक पवित्रा धारण केलाय. युक्रेनची राजधानी कीव्ह शहराच्या सीमा परिसरात रशियन फौजांनी आपले हल्ले वाढवले आहेत. युक्रेमधील बंदर असलेल्या मारियोपोल या शहरावरदेखील रशियाकडून हवाईहल्ले केले जात आहेत. मारियोपोल शहरातील एका स्थानिक नेत्याने रशियन सैनिकांनी एक रुग्णालय ताब्यात घेतले असून तब्बल ५०० लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा केलाय.
दरम्यान, या युद्धामुळे मोठी हानी होत असली तरी युक्रेन रशियाशी दोन हात करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडेमीर झेलेन्स्की यांनी अनेकवेळा सांगितले आहे. तसेच त्यांनी युरोपीयन राष्ट्रांना युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्याचे आवाहन केलेय. तर अनेक युरोपीयन राष्ट्रांनी तसेच अमेरिकेसह नेटोमध्ये सामील असलेल्या देशांनी युक्रेनला पाठिंबा दिलेला आहे. आर्थिक कोंडी व्हावी म्हणून या देशांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लागू केले आहेत.