Russia Attack On Ukraine : युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरात रशियाने हल्ला चढवला आहे. कीव येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपार्टमेंट ब्लॉकला नुकसान झाले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. पोलीस सशस्त्र दलाच्या ऑपरेशनल कमांडने एक्सवर लिहिलं की, रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील आणि पॉलिश सीमेजवळील प्रदेशांनाही लक्ष्य केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनी लोकांना काही काळापासून रशियन क्षेपणास्र हल्ल्यांची अपेक्षा होती. अमेरिकेच्या दूतावासाने गेल्या आठवड्यात युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाच्या आसपास हल्ल्याच्या इशारा दिला होता. रशियाने सोमवारी दोनवेळा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती युक्रेनच्या सैन्यांनी दिली आहे. पहाटे २.३० च्या सुमारास कीवच्या आजूबाजूच्या प्रदेशात १० ड्रोन नष्ट करण्यात आले, असं कीवच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना लक्ष्य केल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे.

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? भारतासाठी हे मुद्दे किती महत्त्वाचे?

युक्रेन युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दृष्टिपथात नसताना अचानक युक्रेनच्या एका धाडसी कृतीमुळे ते नवीन वळण घेण्याची शक्यता आहे. इतके दिवस, खरे तर महिने रशियाने युक्रेनच्या अनेक प्रांतांमध्ये घुसखोरी केली आणि रशियनांना हुसकावून लावण्यासाठी युक्रेन जिवाचे रान करत आहे. पण युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रांतात मुसंडी मारली. अशा प्रकारे रशियाचीच सीमा ओलांडून युक्रेनने त्या देशाला अनपेक्षित कोंडीत पकडले. त्यामुळे रशियाने हा प्रतिहल्ला केल्याचं म्हटलं जातंय.

रशियात आणीबाणी

युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या कुर्स्क या रशियन प्रांतात ७ ऑगस्ट रोजी युक्रेनचे सैनिक आणि चिलखती तुकड्यांनी मुसंडी मारली. या फौजा आणि तुकड्या युक्रेनमधील सुमी शहरातून निघाल्या आणि रशियाची सीमा ओलांडून जवळपास ३० किलोमीटर आत सुझा शहराजवळ त्या पोहोचल्याची माहिती पाश्चिमात्य वृत्तसंस्थांनी दिली आहे. सध्या नेमकी स्थिती काय आहे, याविषयी तपशील उलटसुलट येत आहे. १० ऑगस्टपर्यंत कुर्स्क प्रांतातून ७६ हजार नागरिकांनी पलायन केले आणि रशियाच्या सरकारला तेथे आणीबाणी जाहीर करावी लागली. जवळपास २८ शहरे आणि गावे युक्रेनच्या ताब्यात गेल्याची कुर्स्कच्या गव्हर्नरांनीच दिली आहे. हल्ला बराचसा अनपेक्षित असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याविषयी योजनाच रशियन सरकारला आखता आली नाही. एकूणच संपूर्ण युद्धात रशियन सरकारवर होत असलेल्या ढिसाळपणाच्या आरोपाला युक्रेनच्या ताज्या आक्रमणानंतर आणखी धार आली. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia attack on ukraine launches massive missile and drone sgk