वृत्तसंस्था, कीव्ह
रशियाने युक्रेनच्या सुमी शहरावर रविवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान ३४ जण ठार झाल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पाम संडे साजरा करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लोक जमले असताना सकाळी १०.१५च्या सुमाराला रशियाची दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आदळली. या दुहेरी हल्ल्यानंतर बचावकार्य सुरू असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.

युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान ३२ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तसेच १५ लहान मुलांसह अन्य ११७ जण जखमी झाले आहेत. अधिकृत वाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या या घटनेच्या ध्वनिचित्रफितीत काही मृतदेह जमिनीवर ढिगाऱ्यामध्ये पडले होते, तसेच शहरामधून धुराचे लोट येत होते.

अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याबद्दल रशियावर जोरदार टीका केली आहे. केवळ गलिच्छ व्यक्तीच असे कृत्य करू शकतात असे ते म्हणाले. या हल्ल्याला जागतिक पातळीवर उत्तर दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

रशिया आणि युक्रेनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी एकमेकांवर तात्पुरत्या युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर काहीच तासांनी रशियाने हा हल्ला केला आहे. अमेरिकेच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या युद्धविरामाच्या अटींनुसार, दोन्ही देशांनी एकमेकांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले थांबवण्याचे मान्य केले आहे. त्याचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

आठवडाभरात दुसरा मोठा हल्ला

युद्धविरामासाठी झालेल्या शांतता चर्चेनंतर रशियाने एका आठवड्याच्या कालावधीत युक्रेनवर केलेला आणि सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी करणारा हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी रशियाने ४ एप्रिलला झेलेन्स्की यांचे मूळ गाव असलेल्या क्रायव्ही रिह या शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नऊ लहान मुलांसह २० जण ठार झाले होते.

चर्चांनी कधीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हवाई बॉम्बहल्ले थांबत नाहीत. दहशतवाद्यांना ज्याप्रमाणे उत्तर दिले जाते, त्याच पद्धतीने रशियाला उत्तर दिले पाहिजे. – वोलोदिमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन